माशांच्या साठवणुकीसाठी खाण्यायोग्य बर्फाचा वापर करा

0
अखाद्य बर्फाचा वापर केल्यास कारवाईचा मत्स्यव्यवसाय आयुक्तांचा इशारा
मुंबई : खाण्यायोग्य तसेच खाण्याचे पदार्थ साठविण्यासाठीचा बर्फ आणि खाद्योपयोगी नसलेला (अखाद्य) बर्फ यात फरक करता यावा यासाठी अखाद्य बर्फामध्ये निळा रंग टाकण्याची तरतूद अन्न सुरक्षा व मानके अधिनियमात करण्यात आलेली आहे. माशांच्या साठवणुकीसाठी खाण्यायोग्य बर्फाचा वापर करणे आवश्यक आहे. अखाद्य अशा निळ्या बर्फाचा वापर केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा मत्स्यव्यवसाय आयुक्त अरुण विधळे यांनी दिला आहे.
राज्यात बर्फाचे उत्पादन करताना खाद्य दर्जाच्या बर्फात कोणताही रंग टाकू नये तसेच अखाद्य बर्फामध्ये अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार प्रमाणित निळसर रंग टाकावा अशी तरतूद करण्यात आलेली आहे. खाण्यासाठी व खाण्यायोग्य पदार्थ साठविण्याच्या उद्देशाने अखाद्य बर्फाचे उत्पादन, साठवणूक, वितरण, वाहतूक व विक्री यावर 2006 च्या महाराष्ट्र राज्य अन्न सुरक्षा व मानके अधिनियम आणि 2011 च्या नियमन मधील तरतुदीनुसार अन्न व औषध प्रशासन विभागाकडून कारवाई करण्यात येईल; तर अखाद्य बर्फाच्या उत्पादकांनी त्यामध्ये निळसर रंगाचा वापर केला नाही तर असा बर्फ खाद्य बर्फ समजून संबंधितावर नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असेही  विधळे यांनी सांगितले.