मासूळकर कॉलनीत पोलीस चौकी उभारा

0

पिंपरी-चिंचवड : शहरातील मासूळकर आणि अजमेरा कॉलनीमध्ये गुंडगिरी आणि चोर्‍यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे भागात पोलीस चौकी उभारण्यात यावी, अशी मागणी शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाने पोलिसांकडे केली आहे. याबाबत परिमंडल तीनचे पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांना निवेदन देण्यात आले आहे. निवेदनावर गणेश जाधव, रुपेश कदम, विद्यासागर गायकवाड, गोरखनाथ कवडे, दत्ताराम साळवी, देवेन यादव, रविराज मांडवे, सुनील निकम, रामलाल चौधरी, सौरभ सगर यांच्या सह्या आहेत.

छेडछाडीचे प्रकारही वाढले
या निवेदनात म्हटले आहे की, मासूळकर कॉलनी, अजमेरा कॉलनी परिसरात अंदाजे 20 हजार लोकवस्ती आहे. सर्व प्रकारची दुकाने या परिसरात आहेत. गेल्या काही दिवसांपासून या परिसरातील कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली असून, दुचाकी चोर्‍या आणि भुरट्या चोर्‍यांचे प्रमाण वाढले आहे. मासूळकर कॉलनीतील भाजीमंडईचा वापर व्यसनाधीन मुले गांजा आणि मद्य पिण्याकरता करतात. बाहेरील गुंडप्रवृत्तीची मुले या परिसरात येऊन मुलींची छेडछाड करतात. रोडरोमिओ बेभानपणे गाड्या चालवतात, असेही या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. भाजीमंडईजवळ असलेल्या मोकळ्या जागेत पोलीस चौकी उभारण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.