Accident on highway near Bhusawal : Driver killed on the spot भुसावळ : राष्ट्रीय महामार्गावर भुसावळकडून वरणगावकडे जाणार्या ट्रकने भुसावळकडे मासोळी घेऊन येणार्या छोट्या हत्ती वाहनाला जबर धडक दिल्याने यात छोटा हत्ती गाडीवरील चालक शिरचरण अरूण मानेकर (28, रा.पहूरपूर्णा, ता.शेगाव) या चालकाचा जागेवरच मृत्यू झाला. हा अपघात रविवारी पहाटे चारला रेल्वे उड्डान पूलाजवळ एकेरी वाहतूक असलेल्या पूलाजवळ घडला. या प्रकरणी वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
अपघातात दोन्ही वाहनांचा चक्काचूर
गुजराथमधून राजस्थानमध्ये स्टाईल घेऊन जात असलेला ट्रक (जी.जे. 03 बीटी 5728) या वरील चालकाने वेगात गाडी चालवून समोरून येत असलेल्या छोटा हत्ती या गाडीला (एम.एच.28 ए.बी.4334) ला जबर धडक दिली. या धडकेत छोटा हत्ती वाहनाची पूर्ण कॅबीनच नष्ट झाली. या गाडीवरील चालक शिवचरण अरुण मानेकर (रा.पहूरपूर्णा, ता.शेगाव) याचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात हा रविवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास झाला. अपघातानंतर राजस्थानकडे जात असलेल्या ट्रकचा चालक पोलिसांना माहिती न देता पसार झाला.
तालुका पोलिसात गुन्हा दाखल
अपघाताच्या वेळी राजस्थानकडे जाणारा ट्रक सुध्दा रस्त्याच्या कडेला पलटी झाला. यामुळे गाडीतील सर्वच स्टाईल रस्त्यावर विखुरल्या होत्या. याप्रकरणी फेकरी येथील पोलिस पाटील किशोर मुरलीधर बोरोले यांनी दिलेल्या माहितीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक विलास शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार प्रेमचंद सपकाळे पुढील तपास करीत आहे.