रावेर तहसीलदार उषाराणी देवगुणे यांच्या कारवाईने खळबळ
रावेर ः रावेर तालुक्यातील ग्रामीण भागात विना मास्क वा रुमाल न बांधता बाहेर पडलेल्या चौघांवर तहसीलदार उषाराणी देवगुणे यांनी दंडात्मक कारवाई केल्याने खळबळ उडाली आहे. कोरोनासारख्या जीवघेण्या व्हायरसविरूद्ध लढण्यासाठी प्रशासनाने चांगलीच कंबर कसली आहे. बुधवारी तहसीलदार उषाराणी देवगुणे यांनी लॉकडाऊनचे पालन करण्याच्या वारंवार सूचना करूनही ग्रामीण भागात त्याचे पालन होत नसल्याने त्यांनी मास्क तसेच रूमाल न बांधलेल्या चौघांविरूद्ध प्रत्येक पाचशे रुपयांचा दंड केल्याने खळबळ उडाली आहे. रूपेश महाजन (अहिरवाडी), हेमंत पाटील (खानापूर), किशोर महाजन (चोरवड) व मोहित कुंभार (कर्जोत ) यांना प्रत्येकी 500 रुपये दंड सुनावण्यात आला. यापुढे अत्यंत आवश्यक वेळीच घराबाहेर पडावे तसेच तोंडाला मास्क वा रूमाल बांधावा, अशा सूचना प्रशासनाने केल्या आहेत.