रावेर : कोरोनाचा फैलाव वाढत असल्याने तोंडावर मास्क बांधा, असे सांगितल्याने फैजपूर प्रांताधिकारी अजित थोरबोले यांच्या वाहन चालकावर एकाने रावेरात हात उगारल्याची घटना गुरुवारी घडल्याने खळबळ उडाली. कोरोना व्हायरसपासून बचाव होण्यासाठी नागरीकांना बाहेर पडतांना तोंडावर मास्क बांधा तसेच घरातच सुरक्षित रहा, असे आवाहन फैजपूर प्रांताधिकारी करीत आहेत. गुरुवारी ते रावेर शहरात आले असता डॉ.आंबेडकर चौकात त्यांच्या चालकाने काही नागरीकांना मास्क बांधण्याचे आवाहन केल्यानंतर काहींनी वाहन चालकावरच हात उगारल्याची घटना घडली. या प्रकरणी संशयीत आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.