नवी दिल्ली : हँड सॅनिटायझरच्या काळ्या बाजारावर केंद्र सरकार आक्रमक झालं आहे. २०० मिलीच्या आतील सॅनिटायझरची बॉटल १०० रुपयांच्या आतच विकली जाईल, इतर बॉटलची किंमतही आकारानुसार ठरवली जाईल, असे स्पष्ट आदेश केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री राम विलास पासवान यांनी दिले आहेत. या किंमती देशभरात ३० जून २०२० पर्यंत लागू असतील, असंही ते म्हणाले.
करोना व्हायरसचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर बाजारात विविध प्रकारचे मास्क, ते निर्माण करण्यासाठी लागणारं साहित्य आणि हँड सॅनिटायझरच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात वाढ दिसून आली आहे. सरकारने हे गांभीर्याने घेत किंमती निश्चित केल्या आहेत, असं ट्वीट राम विलास पासवान यांनी केलं. पुढे ते म्हणाले, ‘आवश्यक वस्तू अधिनियमानुसार २ आणि ३ प्लाय मास्कमध्ये वापरल्या जाणाऱ्या फॅब्रिकची किंमत तिच असेल, जी १२ फेब्रुवारी २०२० रोजी होती. २ प्लाय मास्कची ठोक किंमत २ रुपये प्रति मास्क आणि ३ प्लाय मास्कची किंमत १० रुपये प्रति मास्क नसेल.’ दरम्यान, सध्या मेडिकलमध्ये मास्कचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत असून किंमतींमध्ये प्रचंड वाढ करण्यात आली आहे. केंद्राच्या या निर्णयानंतर मास्कच्या किंमती कमी होणं अपेक्षित आहे.
हँड सॅनिटायझरची २०० मिलिची बॉटल ठोक किंमतीत १०० रुपयांपेक्षा जास्त किंमतीत विकली जाणार नाही. इतर बॉटलही आकारानुसार दर ठरवलेल्या असतील. या किंमती ३० जून २०२० पर्यंत संपूर्ण देशात अनिवार्य असतील, असंही राम विलास पासवान यांनी स्पष्ट केलं. देशभरात सॅनिटायझरचा काळा बाजारा दिसून आल्यानंतर केंद्र सरकारने हे आक्रमक पाऊल उचललं आहे.