जळगाव । उसनवारीचे पैसे मागितल्याच्या राग आल्याने मास्टर कॉलनी येथील खान कुटुंबीयांना आठ जणांनी लोखंडी पाइप व काठीने जबर मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना रविवारी रात्री 9 वाजता घडली. या प्रकरणी सोमवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात आठ जणांविरूध्द दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यात पोलिसांनी सोमवारी रात्री चौघांना अटक केली. त्यांना मंगळवारी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. जी. शिंदे यांच्या न्यायालयात हजर केले असता त्यांनी न्यायालयीन कोठडी सुनावली.
दोन संशयीत अद्याप फरार
मास्टर कॉलनीतील मुस्तफा खान गुलाब खान यांनी यासीन खान मासूम खान याला उसनवार पैसे दिले होते. ते पैसे वेळेवर परत न मिळाल्याने शनिवारी मुस्तफा खान यांचा मुलगा अकरम खान हा यासीन खान यांच्याकडे पैसे मागायला गेला. या वेळी यासीन खान याने पैसे न देता हाकलून दिले. अकरम हा पैसे मागायला आल्याचा राग आल्याने यासानी याने यासीन खान मासूम खान (वय 45) गबलू खान मासूम खान, निजाम खान मासूम खान, जाकीर खान अमिन खान (वय 31), अमजद खान गबलू खान (वय 31), रमजान खान अमिन खान (वय 27), अरबाज खान यासिन खान (वय 19), वसिम खान गबलू खान (वय 29, सर्व रा. मास्टर कॉलनी) यांच्यासह मुस्तफान खान यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना घरी जाऊन मारहाण केली होती. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी सोमवारी रात्री जाकीर खान, अमजद खान, रमजान खान, वसीम खान यांना अटक केली. त्यांना मंगळवारी न्यायाधीश शिंदे यांच्या न्यायालयात हजर केले असता त्यांनी न्यायालयीन कोठडी सुनावली. सरकारतर्फे अॅड. अनिल गायकवाड यांनी तर संशयितातर्फे अॅड. कुणाल पवार, अॅड. अजय सिसोदीया यांनी कामकाज पाहिले. यातच एमआयडीसी पोलीसांनी या प्रकरणी यासीन खान मासून खान व अजरबाज खान यासनी खान या दोन जणांना अटक केली आहे. दोघांना बुधवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.