मुंबई । मनोरंजन विश्वातील काही कंपन्यांकडून माहिती चोरीच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर महाराष्ट्र सरकारने असे काम करणार्या 11 संकेतस्थळांवर बंदी घातली आहे. महाराष्ट्र सायबर गुन्हे विभागाने (एमसीडीसीयु) मागील ऑगस्टमध्ये नियोजनबद्धपणे चोरी केलेली माहिती प्रकाशित करणारी संकेतस्थळे काढून टाकण्याची प्रक्रिया सुरू केली होती.
8 कोटी वाचकसंख्या असलेली 11 संकेतस्थळे निलंबित
महाराष्ट्र सायबर सेलचे विशेष पोलीस महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी सांगितले की, या संकेतस्थळांची एकुण वाचकसंख्या 8 कोटींपेक्षा जास्त आहे. वरच्या स्तरातील 11 संकेतस्थळांचा शोध घेत या संकेतस्थळांची नोंदणी करणार्यांना कारवाईबाबतची नोटीस पाठवण्यात आली आहे. त्याला प्रतिसाद देत नोंदणी करणार्यांनी ही 8 कोटी वाचकसंख्या असलेली 11 संकेतस्थळे निलंबित केली आहेत. आणखी 89 संकेतस्थळांबाबत देखील कारवाईची प्रक्रिया सुरू आहे. ही संकेतस्थळे विदेशातील असून त्यांचीही वाचकसंख्या मोठी आहे.
9 हजार संकेतस्थळांच्या माहितीचा अभ्यास केला
राज्य सरकारच्या सायबर सेलचे पोलीस निरिक्षक लक्ष्मण कांबळे यांनी सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना व्हायकॉम आणि स्टारकडून तक्रार मिळाल्यानंतर त्यावर कारवाईसाठी प्रायोगिक प्रकल्प सुरू करण्यात आला. लंडनमधील पोलिसांच्या ’पिपको’ विभागाच्या पार्श्वभुमीवर भारतातील परिस्थितीला अनुरुप 9 हजार संकेतस्थळांच्या माहितीचा अभ्यास करून 19 निकष तयार करण्यात आले आहेत. त्याच्या आधारे माहिती चोरी करणारी संकेतस्थळे शोधली जात आहे.