माहीम समुद्रकिनार्‍याचे पालिकेकडून सुशोभिकरण

0

मुंबई : मुंबई महानगरपालिकेने माहिम समुद्र किनार्‍याचे आकर्षक सुशोभिकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. या किनार्‍यावर रोषणाईबरोबर जीम, पार्किंग, मुलांसाठी खेळणी, स्वच्छ किनारा आणि अद्ययावत सुविधा माहीमच्या बीचवर लवकरच उपलब्ध केल्या जाणार आहेत. यामुळे बीचवर कोळी संस्कृतीचे दर्शन घडणार आहे. गिरगाव, दादर, जुहू, वर्सोवा, अक्सा, मनोरी आणि गोराई अशा सात चौपाट्यांवर मुंबईकरांसह देश-विदेशातील पर्यटकांची दररोज मोठी गर्दी होते. या पार्श्‍वभूमीवर पर्यटनाला चालना देण्यासाठी महापालिकेने आता दुर्लक्षित असलेल्या माहीम चौपाटीच्या सुशोभिकरणाचा निर्णय घेतला आहे.

2.5 किमी चौपाटीच्या सौंदर्यीकरणासाठी पालिका एक कोटी 26 लाख 83 हजार रुपये खर्च करणार आहे. संपूर्ण किनारा स्वच्छ करून आकर्षक बनवण्यात येणार आहे. संपूर्ण किनार्‍याजवळील पायवाटेची पुनर्बांधणी आणि आवश्यकतेनुसार पक्की पायवाट बांधण्यात येईल. पर्यटक आणि रहिवाशांच्या सुरक्षेसाठी दर्जेदार लाईट आणि टॉयलेटची व्यवस्थाही करण्यात येणार आहे. तसेच किनार्‍याच्या सौंदर्यीकरणात जुन्या बोटी प्रदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहेत. याशिवाय बोटी आणि जाळ्यांच्या दुरुस्तीसाठी शेड उभारण्यात येईल. यामुळे पर्यटक-मुंबईकरांना समुद्र किनार्‍यावर कोळी संस्कृतीचे दर्शन घडणार आहे. याशिवाय किल्ल्याची ऐतिहासिक प्रतिकृतीही तयार करण्याचे प्रस्तावित आहे. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी मांडण्यात येणार आहे.

अशा होणार सुधारणा

किनार्‍यावर शोभेची झाडे, फुलझाडे लावणार, पर्यटकांना बसण्यासाठी आरामदायी आसने
हिंदुस्थानी संस्कृतीचे दर्शन घडवणारे सण-उत्सव साजरे करण्यासाठी प्रशस्थ मोकळी जागा
या शिवाय पे-अ‍ॅण्ड पार्कच्या व्यवस्थेमुळे पालिकेला उत्पन्नाचे साधन मिळणार.
शिवाय उंचावरून मुंबईचा नजारा पाहण्यासाठी टॉवरही बनवण्यात येईल.