माहीम, सरावलीत सेनेचा विजय

0

मनोर । पालघर जिल्ह्यातील आठ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत. यामध्ये डहाणू तालुक्यातील तीन ग्रामपंचायती, विक्रमगड तसलुक्यातील एक, तलासरीतील एक, पालघर तालुक्यातील तीन प्रतिष्ठेच्या मानल्या जाणार्‍या व औद्योगिक भांडवल श्रीमंत असलेल्या माहीम आणि सरावली ग्रामपंचायतीवर शिवसेनेने विजय पटकावला असून खैरेपाडा ग्रामपंचायतीवर ग्राम विकास आघाडी यांनी विजय मिळवला आहे. माहीम ग्रामपंचायतीमध्ये शिवसेना पुरस्कृत दीपक रामचंद्र करबट यांनी परिवर्तन पॅनल च्या मुकेश करबट यांचा पराभव केला. 17 ग्रामपंचायत सदस्यांपैकी शिवसेने पुरस्कृत उमेदवारांनी 12, तर परिवर्तन पॅनल च्या पाच उमेदवार विजयी झाले. माहीममध्ये काँग्रेसने उभे केलेले उमेदवार तसेच भाजप व मनसे मधून झालेली बंडखोरी याचा फटका परिवर्तन पॅनल सापडला व शिवसेनेचा विजय सोपा झाला. पालघरचे नवनिर्वाचित शिवसेना जिल्हा अध्यक्ष राजेश शाह यांच्या दृष्टीने हा विजय महत्त्वपूर्ण होता.

सरावली येथे शिवसेना पुरस्कृत लक्ष्मी जनार्दन चांदणे या उमेदवार सरपंचपदावर विजयी झाल्या. सरावलीमधील 17 ग्रामपंचायत जागांपैकी शिवसेनेने 12, ग्राम विकास आघाडीने तीन तर शिवशाही पॅनलच्या उमेदवारांनी दोन जागावर विजय संपादन केला. खैरेपाडा येथील भूमीसेना व शिवसेना पुरस्कृत ग्रामविकास आघाडीने निर्विवादपणे वर्चस्व राखले. सरपंच पदासाठी ग्रामविकास आघाडीच्या भावना संतोष धोडी यांनी विजय मिळवला. ग्रामपंचायती मधील 17 जागांपैकी 15 जागांवर ग्राम विकास आघाडीचे सदस्य निवडून आले असून एक जागा भाजप, तर एका जागेवर बजरंग दल पुरस्कार पुरस्कृत उमेदवारांनी विजय मिळविला. शिलटे गावाची ग्रामपंचायत बिनविरोध झाली होती व बहुजन विकास आघाडी पुरस्कृत पॅनेलचे उमेदवार विजयी झाले होते.

माहीम
सरपंच- दीपक करबट (शिवसेना)
शिवसेना -12
परिवर्तन पॅनेल- 5

सरावली
सरपंच- लक्ष्मी चांदणे (शिवसेना)
शिवसेना -12
ग्रामविकास आघाडी -3
शिवशई पॅनेल- 2

खैरेपाडा
सरपंच – भावना धोडी
(ग्रामविकास आघाडी)
ग्रामविकास आघाडी – 15
भाजप -1
बजरंग दल -1
शिलटे
बिनविरोध बहुजन विकास आघाडी