नंदुरबार । मिटर तपासणीच्या नावाखाली वीजग्राहकांकडून लाखो रूपये गोळा केले जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे वीज मिटर तपासणी करणार्या यंत्रणेकडून महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीबरोबरच जनतेची दिशाभूल केली जात आहे.मोठ्या प्रमाणावर वीजचोरी होत असल्याने या पार्श्वभूमीवर मिटर तपासणी मोहीम वीज वितरणतर्फे राबवली जातेय.
तेरी भी चूप.. अन् मेरी भी चूप..
शहरातील वीज गळती लक्षात घेता किंवा वीजचोरीचा संशय घेता वीज मिटर तपासणी कल्याणच्या एजन्सीला काम देण्यात आले होते. एजन्सीचे पथक आणि स्थानिक वीज कर्मचारी यांच्यावतीने शहरात वीज मिटर तपासणी करण्यात आले. त्यात अनेक ठिकाणी मिटरमध्ये फेरफार केल्याचा अजब कारभार आढळून आला. मिटर तपासणी करणार्या त्या अधिकारी कर्मचार्यांनी स्थानिक मध्यस्थिने तडजोड करून प्रकार उडपण्याचा प्रयत्न केला आहे. लाखो रूपयांचा दंड भरण्यापेक्षत्त त्या यंत्रणेलाच काही रक्कम देवून तेरी भी चुप अन् मेरी भी चुप असा कारभार केल्याचा किस्सा समोर आला आहे. वीज मिटर तपासणीच्या नावाखाली नंदुरबार व नवापूर शहरातून संबंधीत पथकाने लाखो रूपये गंडविल्याचा प्रकार केल्याचे उघड झाले आहे वीज मिटरची तपासणी आता नंदुरबार विभागातीलच कर्मचारी करणार आहेत.
नागरिकांनी तक्रार करावी
वीज मिटर तपासणीच्या नावाखाली जे लोक दंडाच्या भितीने पैशांची मागणी करत असतील अशा लोकांच्या विरोधात लाचलुचपत विभागाकडे रितसर तक्रार करावी.. वीज मिटर तपासणीत पोलिस कर्मचारी असो बुद्धीजीवी घटक असो अशा अनेक लोकांचा समावेश आहे. म्हणून 24 तास वीज देवून ही वेळेवर वीजबील भरण्याची मानसिकता लोकांमध्ये नाही. ती बदलण्याची गरज आहे.
– पंजाबराव बोरसे
अतिरीक्त कार्यकारी अभियंता, वीज वितरण कंपनी