मिटींग संपल्या सेटींग सुरू

0

मुंबई : पंधरा दिवसांच्या प्रचाराचा धुरळा अखेर खाली बसला आहे. शनिवारी रात्री जाहिर प्रचार सभांच्या तोफा थंडावल्या. रविवारी दिवसभर उमेदवार घरोघरी जाऊन मतदारांना भेटी देतील. मंगळवारी सकाळी मतदानाला सुरूवात होणार आहे. त्यामुळे त्याआधी मतांची खेचाखेची करण्यासाठी कराव्या लागणार्‍या सेटींगला आता खर्‍या अर्थाने सुरूवात होणार आहे. आपणच बहुमत घेवून निवडणुका जिंकून दाखवू या अविर्भावात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, मनसेचे नेते राज ठाकरे यांनी मुंबई-ठाणे सह सर्वत्र प्रचाराचा धडाका लावला होता.

शिवसेनेचा जागता पहारा सुरू

रात्री अपरात्री पैसे किंवा वस्तू वाटप करण्यास आल्यास त्याला पकडा आणि धोपटून काढा असा फतवा शिवसेनेने काढला असून मतदान संपेपर्यंत जागता पहारा सुरू ठेवा, असे आदेश मातोश्रीवरून देण्यात आले आहेत. त्यासाठी शिवसेनेच्या प्रत्येक शाखेत विशेष टीम तयार करण्यात आली असून ती टीम रात्रभर गस्त घालणार आहे. पकडा, धोपटा आणि मग तक्रार करा, असा हा आदेश असल्याचे खआत्रीलायक गोटातून समजते. मुंबईतील सर्व झोपटपट्टी विभागात तशा प्रकारचे नियोजन करण्यात आले आहे. शनिवार रात्रीपासूनच ही ड्युटी सुरू होणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.

उमेदवारांचा ‘रात्रीस खेळ रंगणार ’…

रात्रीपासूनच सर्व पक्षीय उमेदवार व्यक्तिगत गाठी भेटीवर जोर देण्यात आहेत. रविवारी हा चाकरमान्यांच्या सुट्टीचा दिवस असल्याने हा दिवस सत्कारणी लाऊन आता पुढील दोन दिवस घरोघरी व्यक्तिगत गाठीभेटीवर भर देण्यास सुरुवात केली आहे. शिवसनेना-भाजपसह सर्व पक्षांनी प्रत्येक विभागातील युवक आणि क्रिडा मंडळांना टार्गेट केले आहे. शिवाय गृहनिर्माण संस्थांच्या कार्यकारीनीला आपल्या बाजूला ओढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. सोमवारी रात्रीपर्यंत हे सुरू राहणार आहे.

भरारी पथकही डोळ्यात तेल घालून

शनिवारी संध्याकाळपासून प्रचार थांबल्यानंतर काही वॉर्डांमध्ये उमेदवार रात्रीच्यावेळी पैशाचे वाटप करण्याची शक्यता जास्त आहे. त्यासाठी पालिकेचे भरारी पथक डोळ्यात तेल घालून आहेत. महापालिकेच्या 227 जागांसाठी मंगळवार 21 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. गेल्या 15 दिवसापासून सर्वच राजकीय पक्षाकडून प्रचाराचा धुमधडाका सुरु होता. शिवसेना भाजपचा 25 वर्षाच्या मैत्रीची काडीमोड झाल्याने महापालिकेच्या निवडणुकीत दोन्ही पक्ष जोमाने उतरले होते. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या खांद्यावर शिवसेनेच्या प्रचाराची धुरा होती. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हाच भाजच्या प्रचाराचा मुख्य चेहरा होता. त्यामुळे मुख्यमंत्री विरुद्ध ठाकरे असा सामना रंगला होता. महाभारताच्या कौरव पांडवांपासून सुरु झालेल्या लढाई आरोप प्रत्यारोपाने खूपच गाजली. दोघांची प्रचाराची भाषा पाणी पाजण्यापासून ते औकात दाखवण्यापर्यंत गेली. माफिया राज, भ्रष्टाचार कारभार असे आरोप भाजपकडून शिवसेनेवर करण्यात आले तर शिवसेनेनेही मुख्यमंत्र्यांच्या नंदलाल समितीचे प्रकरण उकरून काढले. नरेंद्र मोदींनी मुंबईत सभा घेऊन दाखवावी असे आव्हानही ठाकरे यांनी दिले. ठाकरे विरुद्ध फडणवीस असाच सामना दिसून आला. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, व्यंकप्पा नायडू या नेत्यांनी सभा घेतल्या. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा प्रचार फारसा लक्षवेधी ठरला नाही. काँग्रेसकडून अखिल भारतीय काँग्रेसचे प्रवक्ते मनीष तिवारी, माजी केंद्रीय मंत्री पी चिदंबरम, संजय निरुपम यांनी प्रचार केला. तर राष्ट्रवादी काँग्रेस कडून शरद पवार याची एकमेव सभा झाली. दुसर्‍या फळीतील नेत्यांनीच प्रचार केला. एमआयएमच्या ओवेसी बंधूंची मुंबईत एकाच सभा झाली. मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या मुंबईत 3 सभा घेतल्या. शिवसेना भाजपवर त्यांनी जोरदार टीका केली. दोन कोंबड्यांची झुंज सुरु असल्याची टीका त्यांनी केली. शनिवारी सर्व राजकीय पक्षाच्या नेते मंडळींनी शेवटच्या सभा घेतल्यानंतर प्रचाराच्या तोफा थंडावल्या. मात्र प्रत्येक सभेत मतदारांना प्रलोभने दाखवताना आणि निवडून आल्यानंतर विविध कामे करण्याची आश्वासनेही दिली, पण एकमेकांवर टीका आणि उणीदूणीच जास्त काढली. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसेने त्यांच्यावर सतत टीका करण्याची संधी सोडली नाही.