भिवंडी : गणेशोत्सव तसेच अन्य सणांच्या निमित्ताने ग्राहकांचा मिठाई खरेदी करण्याकडे कल अधिक असतो. वाढती मागणी लक्षात घेऊन व्यापारी मोठ्या प्रमाणावर मिठाई तयार करतात. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी लहान मोठे हॉटेल्स आणि मिठाई दुकानदार रंगाचा वापर करून गोड पदार्थ तयार करतात. रंग मिश्रीत गोड पदार्थ आरोग्याच्या दृष्टीने शरीराला अपाय कारक असल्याने दुकानदारांनी मिठाई तयार करताना रंगाचा वापर टाळावा त्याचप्रमाणे दुग्धजन्य पदार्थ योग्य त्या तापमानामध्ये करण्यात यावेत म्हणजेच तयार केलेली मिठाई खराब होत नाही. व्यापार्यांनी या प्रकरणी निश्चितपणे काळजी घेणे आवश्यक असल्याचे मार्गदर्शन अन्न व औषध परीमंडळाचे अन्न सुरक्षा अधिकारी अरविंद खडके यांनी व्यापार्यांच्या बैठकीत केले.
व्यापार्यांच्या बैठकीत अन्न सुरक्षा अधिकार्यांचे मार्गदर्शन
खाद्य पदार्थ विक्रेता संघ यांच्या विद्यमाने भिवंडीतील व्यापार्यांची एक बैठक येथील रिजेंट हॉटेलमध्ये आयोजित केली होती. यावेळी अन्न व औषध प्रशासनातील अधिकार्यांना पाचारण करण्यात आले होते. त्यावेळी उपस्थित व्यापार्यांना अरविंद खडके मार्गदर्शन करताना बोलत होते. त्यांच्या समवेत उदय लोहकरे, निलेश मसारे, राजू आकरूपे आदि अधिकारी सहभागी झाले होते. सणासुदीच्या काळात मिठाईच्या दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणात मिठाईचे पदार्थ असतात. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी दुकानांनी वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवतांना नागरिकांच्या आरोग्याशी खेळणे गैर आहे, असेही खडके म्हणाले.
हॉटेलांमध्ये स्वच्छतेला महत्त्व द्या
हॉटेलमध्ये स्वच्छता व पाणी हे दोन महत्वाचे घटक आहेत. त्याकडे हॉटेल चालक आणि मालकांनी विशेष लक्ष देणे गरजेचे आहे, शिवाय शाकाहारी व मांसाहरी जेवण तयार करतेवेळी स्वतंत्र भांडी आणि साहित्याचा वापर करायल हवा. अन्न पदार्थ तयार करणारा आचारी निरोगी असावा तसेच कामगारांच्या आजारांची गांभीर्याने दखल घेऊन त्यांच्यावर वेळीच औषधोपचार केला जावा अन्यथा त्याचे दुष्परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शासकीय नियमांचे तंतोतंत पालन करून स्वच्छते बरोबर कामगारांना सुट्ट्या आणि गणवेश, हातमोजे वगैरे पुरविण्यात यावेत अशा सूचना केल्या.
नियमांचे उल्लंघन करणार्यांवर कारवाई
मिठाई तयार करतेवेळी उंदिर, झुरळ, माश्यांचा प्रार्दुभाव होणार नाही याची गांभीर्याने दक्षता घ्यायला हवी असे मार्गदर्शन उदय लोहकरे यांनी यावेळी बोलताना करून पुढे असे सांगितले की शासनाच्या नियमांचे उल्लंघन केल्यास दुकानदार किंवा हॉटेल चालकांवर कठोर कारवाई केली जाईल याची संबंधितांनी नोंद घ्यावी असेही ते शेवटी म्हणाले.