भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राजने नुकतेच महिला एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विश्वविक्रम नोंदवला असून यामुळे महिला क्रिकेट संघही पुरूष क्रिकेट संघाला ’हम भी किसीसे कम नही’ असे म्हणताना दिसत आहे. इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या महिला क्रिकेट विश्वचषकातील ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात मितालीने हे धावांचे शिखर गाठले असून 6 हजार धावा करणारी मिताली राज पहिलीच महिला क्रिकेटपटू ठरली आहे. मितालीने इंग्लंडची माजी महिला क्रिकेटर चार्लोट एडवर्डचा विक्रम मोडीत काढला. एडवर्डने 191 एकदिवसीय सामन्यातील 180 डावात 5,992 धावा केल्या आहेत. मितालीने एडवर्डला 183 सामन्यातील फक्त 164 डावांमध्येच मागे टाकत 6 हजाराचा टप्पा गाठला. मितालीने आपल्या एकदिवसीय कारकीर्दीत आतापर्यंत 5 शतके तर 48 अर्धशतके झळकावली असून मितालीचे हे पाचही शतकांमध्ये भारतीय महिला संघ अजिंक्य राहिला आहे, हे विशेष. भारतीय महिला क्रिकेटची ’सचिन’ असलेल्या मितालीच्या या विश्वविक्रमामुळे महिला क्रिकेट संघाला नक्कीच उभारी मिळणार असून पुरुष संघाप्रमाणेच महिला क्रिकेटपटूही सध्या यशस्वी भरारी घेताना दिसत आहेत.
मिताली राजने सर्वाधिक धावांचा विक्रम नोंदवत केवळ महिला क्रिकेटरच नव्हे तर पुरुष क्रिकेटपटूंनाही पछाडले आहे. मितालीने 183 सामन्यांमध्ये केवळ 164 डावात 6 हजार धावा पूर्ण केल्या. विशेष म्हणजे, क्रिकेटचा देव असलेल्या सचिन तेंडूलक रला 6 हजार धावांचा टप्पा गाठण्यासाठी 170 डाव खेळावी लागली होती तसेच भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार राहिलेल्या महेंद्रसिंग धोनीने 6 हजार धावा पूर्ण करण्यासाठी 166 डाव खेळले होते. सचिन व धोनीव्यतिरिक्त मितालीने ऑस्ट्रेलियाचा महान खेळाडू रिकी पॉन्टिंग, वीरेंद्र सेहवाग, युवराज सिंग, ब्रँडन मैक्युलम, दिलशान, हर्षल गिब्ज आदी महान पुरुष क्रिकेटपटूंना याबाबतीत पछाडले आहे. मितालीने आतापर्यंत 183 वनडे सामने खेळले असून यात मितालीची धावांची सरासरी 51.68 अशी दमदार आहे. आपल्या 48 अर्धशतकांसह महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक अर्धशतकांचा विक्रमही मितालीच्याच नावावर आहे. सलग सात सामन्यात अर्धशतके झळकावण्याचा विश्वविक्रमही मितालीने नुकताच नोंदवला आहे. भारतीय महिला क्रिकेटची ’सचिन तेंडूलकर’ म्हणून प्रचलित असलेल्या मिताली राजचे अनेक विक्रम हे थक्क करणारे आहेत. मितालीच्या 183 वनडेत 6 हजार धावा तसेच 10 कसोटी सामन्यात 663 धावा व 63 टी-20 सामन्यात 1708 धावा आहेत. राजस्थानमधील जोधपूरच्या 34 वर्षीय मितालीने आपल्या एकदिवसीय क्रिकेटची सुरुवात 28 जून 1999 मध्ये आयर्लंड संघाविरुद्ध केली होती.पहिल्याच सामन्यात शतक झळकावून मितालीने क्रिकेटप्रेमींचे लक्ष वेधले होते.
– स्वप्निल सोनावणे,
जळगाव