दुबई । आयसीसीच्या महिला फलंदाजांच्या क्रमवारीत भारताची स्टार फलंदाज मिताली राज दुसर्या स्थानावर आहे. या क्रमवारीत काही थोड्या गुणांनी ऑस्ट्रेलियाच्या मेंग लेनिंगने मितालीला मागे टाकले आहे. पण सध्याचा मितालीचा फॉर्म पाहत मिताली लवकरच अव्वल स्थानावर झेप घेईल असे बोलले जात आहे. इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या आयसीसी विश्वचषक स्पर्धेत सातत्यपूर्ण फलंदाजी करत मितालीने लेंनिंग आणि तिच्यात असलेली गुणांची तफावत कमी केली आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या करा किंवा मरा अशा स्थितीतील मितालीने शानदार शतक झळकावून भारतीय संघाला उपांत्य फेरी गाठून दिली होती. मितालीने स्पधेत आतापर्यंत 356 धावा केल्या आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम नोंदवणार्या भारतीय कर्णधार मितालीचे 774 गुण आहेत. लेनिंग हिच्या ती केवळ पाच गुणांनी पिछाडीवर आहे. गोलंदाजीमध्ये झुलन गोस्वामीला तीन तर एकता बिस्तला एका स्थानाने नुकसान झाले. या दोघी अनुक्रमे सहाव्या आणि सातव्या क्रमांकावर आहेत. टीम रॅँकिंगमध्ये ऑस्ट्रेलिया128 गुणांसह अव्वल स्थानावर आहेत. इंग्लंड (124) दुसर्या, न्यूझीलंड (118) तिसर्या तर भारतीय संघ (113) चौथ्या क्रमांकावर आहे.