मित्रमंडळ चौकातील अतिक्रमण काढा

0

पुणे । मित्रमंडळ चौकातील वादग्रस्त भूखंडावरील अतिक्रमण 15 दिवसांत काढावे, अन्यथा 16 व्या दिवशी महापालिकेनेच त्यावर कारवाई करावी, असे आदेश पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने गुरुवारी दिले. त्यामुळे या वादग्रस्त भूखंडांवर महापालिकेचाच ताबा असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

मित्रमंडळ चौकातील 9 एकर भूखंडाच्या मालकीवरून सध्या वाद सुरू असून त्याचा दावा न्यायालयात प्रलंबित आहे. 1979 पासून हा भूखंड ताब्यात असल्याचे महापालिकेचे म्हणणे आहे. या भूखंडावर संबंधित विकासकाने तीन महिन्यांपूर्वी पत्रे बांधून त्याचा ताबा घेतला होता. तसेच त्या भूखंडावर इमारत बांधण्यासाठी बांधकाम विकास विभागाकडे आराखडा सादर केला होता. त्याविरोधात न्यायालयात खटला दाखल केला होता. या प्रकरणाचा पाठपुरावा करणारे राष्ट्रवादीचे सभासद सुभाष जगताप यांनी या प्रकरणी अतिक्रमण करणार्‍यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. पालिकेच्या भूखंडावर अतिक्रमण करणार्‍यांविरोधात एफआयआर दाखल करावा, अशी मागणी आयुक्तांकडे करणार असल्याचे सांगितले.