पोलनपेठेतील हॉटेलसमोर आढळून आला मृतदेह ः खिशातील आधारकार्डवरुन नाव निष्पन्न, नातेवाईकामुळे पटली ओळख
जळगाव : शाहू नगरात भाड्याच्या खोलीत वास्तव्यास असलेल्या प्रिन्टींग काम करणारा कामगार प्रशांत सिद्धेश्वर जंगाळे (35 रा. मुळ रा.धामगणगाव बढे, जि.बुलडाणा) याचा तिक्ष्ण हत्याराने खून केल्याची घटना गुरुवारी सकाळी 10 उघडकीस आली आहे. कामानिमित्ताने बाहेर पडलेला प्रशांत रात्री परतलाच नाही, यामुळे चिंतेत असलेल्या घरमालकासह शाहू नगरातील प्रशांतच्या नातेवाईकांना पोलनपेठेतील युवराज हॉटेलच्या पाठीमागे असलेल्या जेएमपी मार्केटमध्ये जैन ग्लोबल एंटरप्रायजेस या दुकानाच्या ओट्याला लागून रक्तबंबाळ अवस्थेत जंगाळेचा मृतदेह असल्याची बातमी कानी पडली. घटनास्थळापासून 100 मीटर पर्यतच्या अंतरापर्यंत रक्ताचे पावलाचे ठसे आढळून आल्याने हल्ल्यानंतर जीव वाचविण्यासाठी प्रशांत घटनास्थळाहून पळाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. नेमका वाद काय, त्यातून नेमका कोणी त्याचा खून केला ही माहिती मिळू शकलेली नाही. दरम्यान मारेकरच्या शोधार्थ पोलीस यंत्रणा कामाला लागली आहे.
शाहू नगरातील नातेवाईकामुळे पटली ओळख
सकाळी दहा वाजता सवेरा हॉटेलचे मालक हॉटेल उघडण्यासाठी आले असता तेथे अनोळखी मृतदेह आढळून आल्याने त्यांनी शहर पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलीस निरीक्षक अरुण निकम, सहायक निरीक्षक गणेश बुवा, सहायक फौजदार वासुदेव सोनवणे व सहकार्यांनी तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक बापू रोहोम, वियजसिंग पाटील, शरद भालेराव, रामकृष्ण पाटील यांनीही घटनास्थळी धाव घेतली. खिशातील कागदपत्रे काढली असता त्यात आधारकार्ड आढळून आले. त्यावरील नाव व पत्त्यावरुन शरद भालेराव व रामकृष्ण पाटील यांनी नातेवाईकांचा शोध घेतला असता प्रशांतचा मामाचा मुलगा निखील रविंद्र शेटे याला घटनास्थळी आणण्यात आले, तेव्हा त्याने प्रशांतचा मृतदेह ओळखला.
स्वतःला वाचविण्यासाठी जेएमपी मार्केटकडे धावला….
कोंबडी मार्केटजवळील दिशा एंटरप्रायजेस या दुकानाच्या समोर रोज रात्री अंडापाव विक्रीची हात गाडी लागते. या गाडीच्या ठिकाणापासून तर मृतदेह आढळला त्या ठिकाणापर्यंत ठिक ठिकाणी रक्ताचे डाग आढळून आले. या गाडीवर रात्री वाद झाला असावा अशी शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. चाकू किंवा चाकू सारख्या धारदार शस्त्राने प्रशांतच्या छातीत वार झाले असून फुप्फुसावर लागल्याने तो जागीच गतप्राण झाल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान प्रशांत याला कोणी व का मारले असावे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे आहेत, मात्र त्यात घटना कैद झालेली नाही. प्रशांत याच्यावर कोंबडी मार्केटजवळील दिशा एंटरप्रायजेस या दुकानाच्या समोर चाकूने हल्ला झाला आहे. तेथून तो स्वत: ला वाचविण्यासाठी जेएमपी मार्केटकडे धावत आला असावा किंवा मारेकर्याने त्याला ओढत या ठिकाणी आणले असावे अशी शक्यता वर्तविली जात आहे.
दोन दिवसांपूर्वी झाला होता वाद
प्रशांत हा नवीन बी.जे.मार्केटमध्ये प्रिंटीग दुकानावर कामाला होता. त्याचा स्वभाव मनमिळावू होता. कोणाशीही वादाची त्याची पार्श्वभूमी नाही, मात्र मद्याचे व्यसन त्याला होते. शाहू नगरात चंद्रकला डिंगबर कलाल यांच्या मालकीच्या घरात तो भाड्याने रहात होता. एकटाच रहात असल्याने कधी घरी यायचा तर कधी येत नव्हता. प्रशांत याला रात्री उशिरा एका जणाचा कॉल आला होता. हा कॉल कोणी व कशासाठी केला? याची चौकशी पोलीस करीत आहेत. दरम्यान, प्रशांतचा मामाचा मुलगा निखील यानेही त्याचा दोन दिवसापूर्वी एका जणाशी वाद झाला होता, त्यातून ही घटना घडली असावी अशी शक्यता व्यक्त करुन संशयित व्यक्तीचे नाव त्याने पोलिसांना दिले, त्यावर नेमका वाद काय , वाद करणारे कोण यांची पोलिसांकडून पडताळणी केली जात आहे. याप्रकरणी निखिल निखील रविंद्र शेटे याच्या फिर्यादीवरुन शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षकांसह अधिकार्यांकडून पाहणी
शहरात तरुणाचा खून झाल्याची माहिती मिळाल्यावर पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले, अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके, सहायक पोलिस अधीक्षक डॉ.नीलाभ रोहन यांनी घटनास्थळाला भेट देवून पाहणी केली. तसेच मृतदेह ते रक्ताचे डाग कुठपर्यंत आहेत याची पाहणी केली. पोलीस अधीक्षकांनी तपासाच्या सूचना देताना रक्ताचे ठसे, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल क्रमांक याची माहिती संकलित करण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक बापू रोहोम व शहर पोलिस स्टेशनचे निरीक्षक अरुण निकम यांना दिल्या आहेत.
घटस्फोटामुळे पत्नी व मुलापासून राहत होता विभक्त
प्रशांत व पत्नी पल्लवी असे दोघं काही वर्षापासून विभक्त रहात होते. दोघांमध्ये पटत नसल्याने पत्नी मुलगा आर्यन याला घेऊन पिंप्री (फत्तेपूर) ता.जामनेर येथे माहेरी गेली होती. दोघांमध्ये वाद असल्याने प्रशांत जळगावातील सर्व सोडून परत पत्नीसोबत वास्तव्याला गेला होता, मात्र परत दोघांमध्ये खटके उडायला लागल्याने तो एकटाच शाहू नगरात रहात होता. आई कमलबाई व वडील सिध्देश्वर रामचंद्र जंगाळे दोघंही धामणगाव बढे, जि.बुलडाणा येथे वास्तव्याला असून शेती व्यवसाय करतात. वडील कर्करोगाने त्रस्त आहेत. भाऊ सचिन हा नाशिक येथे खासगी नोकरी करतो. बहिणी राणी, सोनी व वैशाली तिघंही विवाहित असून सासरी नांदत आहेत.
मित्राला म्हणाला होता दहा मिनिटात पोहचतो….
बुधवारी रात्री 9.30 वाजेच्या सुमारास प्रशांत याने त्याच्यासोबत प्रिंटींग काम करणार्या मित्रांला फोन केला. कुठे आहात पार्टी करण्याबाबत विचारणा केली. मित्राने दुकानात काम सुरु असून दुकानात आहोत असे सांगितले. त्यावर प्रशांत याने दहा मिनिटात दुकानात येतो, असे मित्रांना सांगितले. यानंतर दीड तास उलटूनही प्रशांत आला नाही. यामुळे सर्व मित्रांनी आप-आपल्या मोबाईलक्रमांकावरुन प्रशांत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रशांतचा फोन लागला नाही. शेवटी प्रशांत दुसर्या कोणासोबत तरी पार्टीसाठी गेला असावा, यामुळे मित्रांनी प्रशांतला पुन्हा फोन केला नाही. जर प्रशांत ठरल्यानुसार मित्रांकडे गेला असता, तर कदाचित दुर्देवी घटना घडली नसती. दरम्यान मुलीवरुन असलेल्या वादातून त्याचा खून झाल्याची माहिती सूत्रांमुळे मिळाली आहे.