मित्रांनीच केला त्या’ दोघांचा खून

0

अनैतिक संबंधाच्या संशयातून मृतदेह नदीत फेकले
पिंपरी-चिंचवड : दोन मित्रांमध्ये अनैतिक संबध असल्याचा संशय घेऊन त्यांच्याच मित्रांनी दोघांचा खून करून दोघांचे मृतदेह वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिले. हा प्रकार गुरुवारी (दि. 10) झाला आहे. याप्रकरणी निगडी आणि तळेगाव पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. थेरगावमध्ये पवना नदीच्या बंधार्‍यात रविवारी (दि.22) एका अज्ञात महिलेचा मृतदेह अढळला. त्याच दिवशी तळेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला. सुरुवातीला या दोन्ही घटना वेगवेगळ्या वाटल्या. परंतु या दोन्ही घटना एकच असून यातील मयत महिला आणि पुरुष एकमेकांचे मित्र असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच या दोघा मित्र-मैत्रिणीचा खून त्यांच्याच मित्रांनी केल्याचेही निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले आहे.

मृत निगडी व देहूरोडचे
सोनाली गायकवाड उर्फ मॅक्स (वय 25, रा. ओटास्किम, निगडी) आणि सलमान शेख (वय 27, रा. देहुरोड) अशी खून झालेल्या दोघांची नावे आहेत. सोनाली ओटास्किम निगडी येथे राहते. गुरुवारी (दि. 19) रात्री आठच्या सुमारास सोनालीला भेटण्यासाठी एक मित्र आला. त्या मित्रासोबत सोनाली बाहेर गेली. ती रात्रभर घरी आली नाही. तिच्या भावाने तिच्याबद्दल तिच्या मित्रांकडे चौकशी केली. तेंव्हा एका मित्राने सोनाली तिच्या मित्रांसोबत देहूरोड येथून गेली असल्याची माहिती मिळाली. परंतु ज्या मित्रांसोबत गेली आहे, त्यांच्याबाबत काहीच माहिती मिळाली नाही.

पोलिसांनी असा घेतला शोध
निगडी पोलिसांनी प्रकरणाचा तपास करत गुरुवारी दारू पिण्यासाठी एकत्र असलेल्या मित्रांना शोधून काढले. त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता सोनाली आणि सलमान यांच्या अनैतिक संबंध असल्याने त्यांचा खून केल्याची कबुली गुन्हेगारांनी दिली. तसेच या प्रकरणाची माहिती उघडकीस येऊ नये, यासाठी सोनालीचा मृतदेह पवना नदीत फेकून दिला. तर सलमानचा मृतदेह मावळ भागात तळेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत फेकून दिला. चार जणांना ताब्यात घेतले असून पोलीस तपास करीत आहेत.