पिंपरी चिंचवड : बालपणीच्या मित्राने तरुणीचा विनयभंग केला. तसेच दोघांनी मिळून काढलेले फोटो सोशल मीडियावर टाकून तसेच तरुणीच्या आई-वडिलांना पाठवून तिची बदनामी करण्याची धमकी दिली. ही घटना फेब्रुवारी 2019 ते 8 सप्टेंबर 2019 या कालावधीत हिंजवडी येथे घडली. सुजित दत्तात्रय खुर्द (वय 24, रा. उमानगरी, सोलापूर) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपी तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी 22 वर्षीय तरुणीने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सुजित आणि फिर्यादी तरुणी बालपणीचे मित्र आहेत. आरोपी सुजित फिर्यादी तरुणीच्या घरी आला. त्याने ‘मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही. तू, नाही म्हणालीस तर मी जीवाचे बरे वाईट करून घेईन’ अशी धमकी देत तरुणीशी अश्लील वर्तन करून तिचा विनयभंग केला. सुजित याने फिर्यादी तरुणीसोबत काढलेले फोटो सोशल मीडियावर आणि तिच्या आई वडिलांना पाठवून देण्याची धमकी दिली. याबाबत तरुणीने पोलिसात धाव घेतली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.