मित्राचे भांडण सोडविल्याच्या रागातून शेळगावात तरुणास मारहाण : दोघांविरोधात गुन्हा

जळगाव : मित्राचे भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या एका तरुणाला दोघांनी शिवीगाळ करून बेदम मारहाण केली. ही घटना शेळगाव येथे घडली. याप्रकरणी नशिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

दोघांविरोधात गुन्हा
भूषण आनंदा पाटील (36 रा.शेळगाव, जि.जळगाव) हा तरुण शेती करतो. 27 जानेवारी रोजी सायंकाळी कानसवाडा फाट्याजवळ भुषण पाटील आणि त्याचा मित्र संदीप लक्ष्मण धांडे हे दोघे उभे होते. काहीही कारण नसतांना गावातीलच लोकेश एकनाथ पाटील आणि सोबत अनोळखी तरूण यांनी येऊन संदीप धांडे याला मारहाण करण्यास सुरुवात केली. मारहाण सुरू असल्याचे पाहून भुषण पाटील यांनी सोडवा-सोडव केली असता, लोकेश आणि त्याच्यासोबत असलेल्या एकाने भूषण पाटील व त्याचा मित्राला बेदम मारहाण करून शिवीगाळ केली तर रस्त्यावर पडलेली लाकडी पाटीने भूषणच्या डोक्याला मारहाण करून दुखापत केली. जखमी अवस्थेत भूषणला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. याप्रकरणी मंगळवार 8 फेब्रुवारी रोजी दुपारी एक वाजता नशिराबाद पोलिस ठाण्यात संशयित आरोपी लोकेश एकनाथ पाटील आणि एक अनोळखी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक फौजदार संजय जाधव करीत आहे.