मिना म्हसे यांना युवा शिक्षक पुरस्कार

0

सणसवाडी । शिक्षणविवेक पुणे व टी. बी. लुल्ला चॅरिटेबल फाउंडेशन, सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने दिल्या जाणार्‍या शिक्षण विज्ञान विभागातील शिक्षण माझा वसा हा राज्यस्तरीय युवा शिक्षक पुरस्कार मिना म्हसे यांच्या औषधी वनस्पतींचे उपयोग आणि महत्व या शोधनिबंधास जाहीर झाला. सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र, पुष्पगुच्छ व रोख रक्कम पाच हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. हा पुरस्कार डेक्कन मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन व्हॉल माधवनगर रोड सांगली येथे देण्यात आला. वढू खुर्द ता. हवेली येथील प्राथमिक शाळेतील उपक्रम शिक्षिका मिना अशोक म्हसे-आसने यांनी परसबागेत व टेरेसवर औषधी वनस्पती लावून त्यांचे विविध आजारावर होणारे उपयोग या विषयीचे औषधी वनस्पती पुस्तक संपादित केले आहेत. परसबागेत औषधी वनस्पतींची लागवड करून घरगुती औषधांचा उपयोग वाढावा तसेच औषधी वनस्पतींचे संगोपनही कसे करावे या विषयावर लिहिलेल्या शोधनिबंधाला हा पुरस्कार देण्यात आला.

विद्यार्थीनींसाठी राबवला उपक्रम
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वढू खुर्द मधील उपक्रमशील शाळेने परिसर सहलीचे आयोजन करून इयत्ता पहिली ते सातवीमधील विद्यार्थीनींना लोणीकंद येथील टेकडीवर नेऊन बीपासून रोप कसे बनते, रोपांची वाढ कशी होते, त्याची लागवड कशी करतात, औषधी वनस्पतीचे काय उपयोग आहेत याचे महत्त्व महत्व व गुणधर्म सांगितले. या उपक्रमाचे कौतुक गटशिक्षण अधिकारी परिहार यांनी केले आहे.