यावल- यावल-भुसावळ राज्य मार्गावर प्रवासी वाहतूक करणार्या मिनीडोअरचे टायर फुटल्याने वाहन उलटल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला. शुक्रवारी सकाळी 11 वाजता ही घटना घडली. शुक्रवारी सकाळी यावल येथील राहणार साबीर अय्युब खाटीक (41) हे नाशिकहुन येणार्या आपल्या मोठ्या मुलीला घेण्यासाठी भुसावळ रेल्वे स्थानकावर जात असतांना प्रवासी वाहतूक करणार्या मिनीडोअर (क्रमांक एम.एच.19-7068) या वाहनाचा निमगाव-टेंभी गावाजवळील बंद पडलेल्या व्यंकटेश सॉ मिलच्या खुल्या जागेसमोरील वळणावर टायर फुटले. या अपघातात यावलचे साबीर अय्युब खाटीक यांचा मृत्यू झाला. या अपघातातील जखमींची संख्या कळू शकली नाही. मयत खाटीक यांचा मृतदेह यावल ग्रामीण रुग्णालयात आल्यानंतर नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती.