मिनी ट्रॅव्हल्सच्या अपघातात 6 ठार

0

सांगली । विठ्ठल-रूखमाईच्या दर्शनावरून परत घरी जात असतांना मिरज-पंढरपूर महामार्गावर 21 रोजी पहाटे मिनी ट्रॅव्हल्स आणि ट्रकमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात 6 जण जागीच ठार झाले असून यात एक महिला ,दोन बालके, तीन पुरूष यांचा समावेश आहे. तर 10 जण जखमी झाले. कोल्हापूरच्या माले गावातील भाविक विठ्ठल-रखुमाईच्या दर्शनासाठी पंढरपूरला गेले होते. देवदर्शनकरुन परतत असताना हा अपघात झाल्याचे समजते.

बसचालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याचा अंदाज
शुक्रवारी पहाटे चारच्या सुमारास मिरज – पंढरपूर मार्गावर भाविकांच्या मिनी बसने रस्त्यालगत थांबलेल्या वाळूच्या ट्रकला कवठेमहाकाळ तालुक्यातील आगळगाव फाट्याजवळ मागून धडक दिली. ही धडक एवढी जोरदार होती की या भीषण अपघातात 6 जणांचा जागीच मृत्यू झाला. तर 10 जण जखमी झाले आहेत. या अपघातात मिनी ट्रॅव्हल्सचा चक्काचूर झाला. या अपघातात नंदकुमार हेडगे (वय 37), रेणुका हेगडे (वय 35), आदित्य हेगडे (वय 12), लखन राजू संकाजी (वय 26), विनायक लोंढे (वय 40) आणि गौरव नरदे (वय 7) यांचा मृत्यू झाला. सर्व मृत प्रवासी मागासवर्गीय गृहनिर्माण सोसायटी, कोयना कॉलनी, वळीवडे गांधीनगर, कोल्हापूर येथील रहिवासी आहेत. जखमींपैकी रेखा देवकुळे, स्नेहल हेगडे (वय 20) आणि काजल हेगडे (वय 19) यांची प्रकृती गंभीर आहे.तर सावित्री आवळे (वय 55), शीतल हेगडे (वय 42), सोनल कांबळे (वय 36), कोमल हेगडे (वय 20), कल्पना बाबर (वय 40), अनमोल हेगडे (वय 12), गौरी हेगडे (वय 7), शुभम कांबळे (वय 10) अशी या अपघातातील अन्य जखमींची नावे आहेत. चालक संदीप यादव हा घटनेनंतर पसार झाला आहे. जखमी झालेल्या 10 प्रवाशांवर मिरजमधील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.