भीमाशंकरसाठी 40 बस खरेदीचा निर्णय; ‘एसटी’च्या अधिकार्यांना विचारला जाब
पुणे : भीमाशंकर तीर्थक्षेत्राचा कालापालट करण्यासाठी राज्य सरकारने सुमारे 148 कोटी 37 लाख रुपयांना मंजुरी दिली आहे. या आराखड्यानुसार भाविकांसाठी 40 मिनीबस खरेदीचा निर्णय घेण्यात आला आहे. जानेवारी महिन्यात बसेस खेरदीच्या सूचना देण्यात आल्या; पण बसेसची खरेदी करण्यात आलेली नाही. त्यावरून राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अधिकार्यांना फैलावर घेत ‘एसटी’च्या अधिकार्यांना जाब विचारला.
भीमाशंकर विकास आराखड्याची आढावा बैठक मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवन येथे पार पडली. बैठकीला वन विभागाचे सचिव विकास खरगे, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे, पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक संदीप पाटील उपस्थित होते.
4 कोटी 75 लाखांचा निधी
भीमाशंकर विकास आराखडा मंजूर होऊन अपेक्षित विकासकामे झाली नसल्याने मुनगंटीवार यांनी अधिकार्यांना फैलावर घेतले. या विकास आराखड्यानुसार 40 मिनीबस घेण्यासाठी सुमारे 4 कोटी 75 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असताना आणि याबाबत जानेवारी महिन्यात सूचना दिल्यानंतरही बसेस खरेदी करण्यात आलेल्या नाहीत. ‘मिनी बसेस’ कमी करून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाला (एसटी) लाल रंगाच्या मोठ्या गाड्या खरेदी करायच्या आहेत का? असा सवाल करून असा वेगळा पायंडा पाडण्याचा प्रयत्न करू नका, असेही त्यांनी अधिकार्यांना सुनावले.
20 ते 25 बसेस खरेदी करा
गाड्या खरेदी करण्याचे काम 15 दिवसांचे आहे. त्यासाठी विलंब का लागला? या बसेस चालविण्यासाठी चालक आणि वाहकांचा प्रश्न निर्माण होत असेल, तर 40 ऐवजी 20 ते 25 बसेस खरेदी करा. उर्वरित बसेस कालांतराने खरेदी करा. या बसेसची सेवा देताना कल्पकतेचा वापर करा. बसेसमध्ये बसल्यानंतर भाविकाच्या मनात श्रद्धा निर्माण झाली पाहिजे, असे मुनगंटीवार म्हणाले. एखाद्या विकासकामासाठी निधी उपलब्ध नसेल, तर याबाबत माहिती द्या. त्यानंतर ताबडतोब निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे ते म्हणाले.
148 कोटी 37 लाखांचा निधी मंजूर
राज्य सरकारने विविध प्रकारच्या 11 विकासकामांसाठी सुमारे 148 कोटी 37 लाख मंजूर केले आहेत. त्यामध्ये सामूहिक सेवा केंद्र, प्रवेशद्वार, पायरीमार्ग, सार्वजनिक स्वच्छतागृहे, संरक्षण भिंत, रस्ते विकास, मंदिर परिसर संवर्धन व भाविकांसाठी पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा योजना, भुयारी गटार योजना, घनकचरा व्यवस्थापन, विद्युतीकरण, भीमा नदी सुशोभिकरण, कोंढवळ तलाव आणि पाणी स्रोतांचे बळकटीकरण, वाहनतळ, आरोग्य पथक, महादेव वन, विश्रामगृह अशी कामे आहेत.