मिरज – मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात अपयशी ठरलेल्या महापालिका प्रशासनाचा फटका शुक्रवारी मिरजकरांना बसला. ब्राह्मणपुरी व परिसरात एका पिसाळलेल्या कुत्र्याने तब्बल १७ हून अधिकजणांचा चावा घेतल्याने सर्वांचेच धाबे दणाणले.
आरोग्य अधिकार्यांना नागरिकांनी कळवून तब्बल १६ तासानंतर डॉग व्हॅनने कुत्र्याचा शोध घेतला. मिरजेतील आरोग्याधिकारी प्रथमपासूनच अकार्यक्षमतेबद्दल प्रसिद्ध आहेत. त्याची प्रचिती मिरजकरांना पुन्हा एकदा आली. पिसाळलेल्या कुत्र्याने मिरजेत १७ हून अधिकजणांचा चावा घेतला. बुधवारी सायंकाळी ५ वाजल्यापासून या कुत्र्याने ब्राह्मणपुरी, लोंढे कॉलनी, मंगळवार पेठ, गांधी चौक, झारी भाग या भागात दहशत पसरविली. महापालिका आरोग्याधिकार्यांना दूरध्वनीवरून नागरिकांनी कळविल्यानंतर तब्बल १६ तासांनी महापालिकेच्या डॉग व्हॅनने या पिसाळलेल्या कुत्र्याचा शोध सुरू केला.
पिसाळलेल्या कुत्र्याने १७ हून अधिकजणांना चावा घेतला असला तरी, महापालिकेकडून मात्र ४ जणांनाच श्वानदंश झाल्याचे सांगण्यात आले. महापालिका आरोग्याधिकारी आंबोळे यांना बुधवारी रात्री काही नागरिकांनी पिसाळलेल्या कुत्र्याबद्दल सांगितले, तथापि डॉक्टर आंबोळे यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. कुत्र्याने चावा घेतल्याच्या घटनांमध्ये वाढ होऊन रुग्ण मिरज शासकीय रुग्णालयात दाखल होऊ लागल्यानंतर मात्र महापालिका प्रशासन खडबडून जागे झाले, आणि तब्बल 16 तासांनंतर डॉग व्हॅन कुत्र्याचा शोध घेत शहरात फिरू लागली. वरद बने (वय १४), रमाकांत नागवेकर (वय ४९), शिवाजी कोळेकर (वय १८) हिंमत बने (वय ४९), सूरजसिंग वागळे, लक्ष्मी जोशी, शशिकला दाणेकर, विजय पाटील, विद्या पाटील, नसिमबी मालगावे, शिंदगे, टाकवडे, बादले, सबजादे, वाणी आदिंचे पिसाळलेल्या कुत्र्याने लचके तोडून शहरात दहशत निर्माण केली. दिसेल त्याचा चावा कुत्रे घेऊ लागल्याने लोकांमध्ये घबराट पसरली. मिरज शासकीय रुग्णालयात कुत्र्याच्या हल्ल्यातील जखमींनी धाव घेतली. जखमींची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.
मिरज शासकीय रूग्णालयात एकापाठोपाठ एक रुग्ण येत होते. दरम्यान मिरज शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक वैभव सोनार यांनी सांगितले की, श्वानदंशावरील एआरएस व एआरव्ही लस पुरेशा प्रमाणात मिरज शासकीय रुग्णालयात उपलब्ध आहे. मोकाट कुत्र्यांबाबत महापालिका पूर्वीपासून उदासिन असल्यानेच मिरज शहरात कुत्र्यांच्या टोळ्या निर्माण झाल्या आहेत. शहरासाठी आठवड्यातून दोन दिवस डॉग व्हॅन येते. पण किती कुत्री पकडली? आणि ती कोठे नेवून सोडली या संदर्भात महापालिकेकडे कोणताच लेखाजोखा नाही.
मिरजेजवळील बेडग रस्त्यावरील कत्तलखाना परिसरात कुत्र्यांनी एका चिमुरडीचा बळी घेतला होता. त्या संदर्भात १४ लाखांची नुकसान भरपाई या मुलीच्या कुटुंबीयांना देण्याचा आदेश मानवी हक्क आयोगाने नुकताच दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेने कुत्र्यांच्या प्रश्नासंदर्भात गांभीर्याने घेणे गरजेचे होते तथापि तसे झालेले नाही, याबद्दल मिरजकरांमधून नाराजी व्यक्त होत आहे.