भाईंदर- मिरा भाईंदर महापालिका निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे. सध्या निवडणूकीच्या निकालात महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष मागे पडला आहे. अशा परिस्थितीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा पक्ष उभारणीच्या कामाला जोरदार सुरूवात केली आहे. तर, दुसरीकडे मिरा-भाईंदर मनपा निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी मनसे स्वबळावर लढणार आहे, अशी माहिती मनसे शहराध्यक्ष प्रसाद सुर्वे यांनी दिली.
मनसेने यंदाच्या मिरा-भाईंदर महापालिका निवडणुकीत सावध पावले टाकत स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे, परंतु, इतर पक्षाने युती वा आघाडीचा प्रस्ताव दिल्यास त्यावर पक्षाध्यक्षांसोबत चर्चा केली जाईल. त्यांच्या निर्देशानुसार एकत्रित लढण्याचा निर्णय राखून ठेवला आहे, असेही मनसे शहराध्यक्ष प्रसाद सुर्वे यांनी सांगितले.
२००७ रोजीच्या महापालिका निवडणुकीत मनसेच्या ४ जागा निवडून आल्या होत्या. त्यानंतर झालेल्या २०१२ रोजीच्या निवडणुकीत मनसेची केवळ एकमेव उमेदवार निवडून आला होता. तो उमेदवारही सेनेत दाखल झाला. यंदाच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी चर्चा केली असता मनसे सैनिकांना लढण्याचे निर्देश दिले आहेत, असेही शहराध्यक्ष प्रसाद सुर्वे यांनी सांगितले. पक्षाची स्थिती सध्या नाजूक असली तरी निवडणूकीत स्वबळावर उतरण्याची तयारी करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. या निवडणूकीसाठी सुमारे 30 इच्छुकांना संधी देण्याचा निर्णय तुर्तास घेण्यात अाल्याचेही सूत्रांकडून माहिती आहे.