भाईंदर – मिरा-भाईंदर महापालिका निवडणूक तोंडावर अाली असताना मतदार यांद्यामधील घोळ मिरा भाईंदर (शहर) जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष अनिल सावंत यांनी समोर आणला. मिरा भाईंदर महापालिका निवडणूकची प्रभागनिहाय मतदार यादी मंगळवार, २७ जून रोजी महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली. यादीची मूळप्रत अद्याप उपलब्ध करण्यात आली नाही. यादी प्रसिद्ध करण्यास आधीच चार दिवस उशीर झाला असताना या यादीमध्ये प्रचंड चूका असल्याचे अनिल सावंत यांनी सांगितले. गुरुवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
मिरा भाईंदर महापालिका निवडणूकीसाठी प्रभागनिहाय मतदार यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली. प्रसिद्ध झालेल्या यादीमध्ये मोठ्या प्रमाणावर चुका असल्याचे अनिल सावंत यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले. अनिल सावंत म्हणाले, “यापूर्वी वारंवार पत्रव्यवहार करूनसुद्धा मतदार याद्या प्रसिद्ध करतेवेळी कोणत्याही प्रकारची काळजी घेण्यात अालेली नाही. प्रभागांच्या मतदारांची अदलाबदल करणे, पूर्ण पत्याशिवाय मतदारांची चुकीची नोंद करणे, प्रभागांची हद्द विचारात न घेणे, दुबार मतदारांची नावे कमी न करणे, नवीन मतदारांची झालेली नोंदणीतील काही नावे हेतुपरस्पर नोंदणी न करणे, अगोदरच असलेल्या मतदारांची परत नोंदणी करून विशिष्ट प्रभागात त्याचा समावेश करणे यांसारख्या बर्याच चुका प्रारुप मूळ मतदार यादीमध्ये व प्रारूप पुरवणी मतदार यादीमध्ये आढळून आलेले आहेत.”