मिलिंद एकबोटेंना कोणत्याहीक्षणी अटक!

0

अटकपूर्व जामीनअर्ज उच्च न्यायालयाने फेटाळला

पुणे : भीमा कोरेगाव दंगलप्रकरणातील मुख्य आरोपी व हिंदू एकता आघाडीचे प्रमुख मिलिंद एकबोटे यांनी अटकपूर्व जामिनासाठी दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी व न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठाने फेटाळून लावली आहे. या शिवाय, सर्वोच्च न्यायालयात अपील करता यावे, यासाठी आदेशाला स्थगिती देण्यास किंवा अटक होण्यापासून हंगामी संरक्षण देण्यासही खंडपीठाने नकार दिला आहे. त्यामुळे एकबोटे यांना कोणत्याहीक्षणी अटक होण्याची शक्यता आहे. बुधवारी न्यायमूर्ती भूषण गवई व न्यायमूर्ती बी. पी. कुलाबावाला यांच्या खंडपीठाने सुनावणी घेण्यास नकार दिल्यानंतर एकबोटे यांनी अटक टाळण्यासाठी ताबडतोब दुसर्‍या खंडपीठाकडे धाव घेतली होती. मात्र, या खंडपीठाकडूनही त्यांना दिलासा मिळू शकला नाही. त्यामुळे ते आता सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्याच्या तयारीत असल्याचे सांगण्यात आले.

गुन्हे रद्द करण्याची एकबोटेंची मागणी
पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाने 22 जानेवारीरोजी एकबोटे यांचा अटकपूर्व जामीनअर्ज फेटाळून लावला होता. त्याविरोधात त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. पोलिसांनी आपल्यावर गुन्हे दाखल करताना चुकीचे आरोप लावलेत. असा दावा करत एकबोटे यांनी हे गुन्हेच रद्द करावेत, अशी मागणी न्यायालयाकडे केली आहे. या प्रकरणावर तत्काळ सुनावणी घेण्यासाठी हे प्रकरण नव्या खंडपीठाकडे बुधवारी सादर करण्यात आले. परंतु, न्यायमूर्ती गवई व न्यायमूर्ती कुलाबावाला यांनी त्यांची याचिका सुनावणीस घेतली नाही. त्यामुळे एकबोटे यांनी दुसर्‍या खंडपीठाकडे धाव घेतली. शुक्रवारी या खंडपीठाने एकबोटे यांच्या याचिकेवर सुनावणी घेतली. या सुनावणीत त्यांची याचिका फेटाळून लावत, त्यांना कोणताही दिलासा देण्यास नकार दिला. एकबोटे यांच्यावर दाखल गुन्हे गंभीर आहेत, याची दखल या खंडपीठाने घेतली. 1 जानेवारीला भीमा कोरेगाव येथे शौर्यस्तंभाला वंदन करण्यासाठी जमलेल्या आंबेडकरी अनुयायांवर सणसवाडी येथे दीड ते दोन हजाराच्या जमावाने हल्ला केला होता. त्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. या जमावाला एकबोटे व संभाजी भिडे यांनी चिथावल्याचा आरोप आहे. एकबोटे यांच्याविरोधात पिंपरी व औरंगाबाद येथे गुन्हे दाखल आहेत. नंतर हे गुन्हे शिक्रापूर पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आलेले आहेत.

एकबोटे, भिडे यांच्यावरील आरोप
* अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हे दाखल
* दगडफेकीस प्रवृत्त करणे, लोकांना चिथावणी देणे