पुणे : गो शाळा चालविण्याच्या वादातून समस्त हिंदु आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे व त्यांच्या साथीदारांना गो-रक्षकांकडून लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. ही घटना पुरदंर तालुक्यातील झेंडेवाडी येथे घडली. याप्रकरणी सासवड पोलीस ठाण्यात मिलिंद रमाकांत एकबोटे यांनी फिर्याद दिली आहे.
पंडित मोडक व विवेक मोडक हे वडकीमध्ये हंबीरराव मोहिते गो शाळा चालवितात. गो रक्षा संबंधी एक महिन्यापूर्वी आक्षेपार्ह पोस्ट फेसबुकवर टाकली होती. तेव्हा मिलिंद एकबोटे यांना सबुरीने घेण्यास सांगितले होते़. त्यावरुन त्यांच्यात वाद झाला होता. पुरंदर तालुक्यातील मौजे झेंडेवाडी येथील ज्वाला मंदिरात मिलिंद एकबोटे हे कार्यकर्त्यांसह देवदर्शन व प्रवचनासाठी गेले होते. तेथील कार्यक्रम संपल्यानंतर ते जवळच असलेल्या शनि मंदिरासमोर जेवणासाठी बसले असताना तेथे पंडित मोडक , विवेक मोडक , निखिल दरेकर हे ४० ते ५० लोकांचा जमावासह आले. पंडित मोडक यांनी एकबोटे यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत सासवड मध्ये राहायचे नाही अशी धमकी दिली. तसेच एकबोटे यांना मारहाण केली़. अभिषेक वाघमोडे याच्या हातावर चाकून चाकूने वार केला़. प्रतिक गायकवाड याला देखील जमावाने मारहाण करुन डोळ्यात मिरचीची पूड टाकण्याचा प्रयत्न केला. आपल्यावर असलेल्या रागातून पंडित मोडक, विवेक मोडक यांच्या सांगण्यावरुन त्यांच्या साथीदारांनी मारहाण केली. या गुन्हयाचा तपास सासवड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ए.बी.घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली पोेलीस करत आहे.