मिलिंद सोमणने ‘अल्ट्रामॅरेथॉन’ केली अनवाणी पायांनी पूर्ण!

0

मुंबई : अभिनेता मिलिंद सोमणने गेल्या वर्षी आयर्नमॅन हा किताब पटकावून एक पाऊल पुढे जात ‘अल्ट्रामॅन’ असल्याचे दाखवून दिले आहे. 51 व्या वर्षी अल्ट्रामॅरेथॉनमध्ये पहिल्या दिवशी दहा किलोमीटर स्विमिंग आणि 142 किलोमीटर सायकलिंग, दुसऱ्या दिवशी 276 किमी सायकलिंग आणि तिसऱ्या दिवशी तब्बल 84 किमी धावणे. विशेष म्हणजे मिलिंदने एकट्याने ही शर्यत अनवाणी पूर्ण केली आहे. 517.5 किमीची शक्यप्राय वाटणारी ही शर्यत मिलिंदसह पाच भारतीयांनी साध्य केली आहे. अमेरिकेतील फ्लोरिडा स्टेटमधल्या ओरलँडोमध्ये ही स्पर्धा पार पडली. ह्या स्पर्धेत त्याने केलेली कामगिरी निश्चित वाखाणण्याजोगी आहे.

सर्वात कठीण मानली जाणारी स्पर्धा
मिलिंद सोमणसोबत अभिषेक मिश्रा, कौस्तुभ राडकर, पृथ्वीराज पाटील आणि मनमढ रेब्बा यांनी अल्ट्रामॅरेथॉन यशस्वीरित्या पार केली आहे. मिलिंदनेच फेसबुकवर त्याच्या कामगिरीची माहिती चाहत्यांना दिली आहे. विशेष म्हणजे मिलिंदने ही मॅरेथॉन अनवाणी पूर्ण केली. स्पर्धा पूर्ण केल्यानंतर मिलिंदने, मी आनंदी असून भारतीय असल्याचा मला अभिमान आहे, असे त्याने म्हटले. झुरिचमधील सर्वात कठीण मानली जाणारी ट्रायथलॉन मिलिंद सोमणने गेल्या वर्षी यशस्वीपणे पार केली होती. स्वित्झर्लंडच्या झुरिचमध्ये पार पडलेल्या या स्पर्धेमध्ये 7 भारतीयांसह देशविदेशातील दोन हजार स्पर्धक सहभागी झाले होते. वर्ल्ड ट्रायथलॉन कॉर्पोरेशनने आयोजित केलेल्या या स्पर्धेत 3.8 किलोमीटर स्विमिंग, 180.2 किलोमीटर सायकलिंग, 42.2 किलोमीटर धावण्याचा समावेश होता. मिलिंदने झुरिचच्या ट्रायथलॉनमध्ये पहिल्यांदाच सहभाग नोंदवला होता. विशेष म्हणजे 16 तासांत पूर्ण करण्यास अवघड मानली जाणारी ही स्पर्धा त्याने 15 तास 19 मिनिटांतच पूर्ण केली होती.

काय आहे मॅरेथॉन स्पर्धा
फ्लोरिडात रंगलेली मॅरेथॉन स्पर्धा जगातील सर्वात कठीण समजली जाते. तिला अल्ट्रामॅन असेही म्हटले जाते. यामध्ये पोहणे, धावणे आणि सायकलिंग असे तीन टप्पे स्पर्धकाला पार करावे लागतात. तीन दिवस चालणाऱ्या अल्ट्रामॅन स्पर्धेत पहिल्या दिवशी 10 कि.मी. पोहणे आणि 142 कि.मी. सायकलिंग करणे, दुसऱ्या दिवशी 276 कि.मी. सायकलिंग तर तिसऱ्या दिवशी 84 कि.मी. धावावे लागते.