मिळकतकराची बिले यंदाही पोस्टाने मिळणार!

0

पुणे । महापालिकेच्या मिळकतकर विभागाकडून यावर्षीही नागरिकांना बिलांचे वाटप पोस्टाद्वारेच केले जाणार आहे. यावर्षी तब्बल 10 लाख बिलांचे वाटप केले जाणार असून त्यात सव्वा लाख बिले ही नव्या 11 गावांतील आहेत. या बिलांच्या वाटपाचे काम पोस्टास देण्यासाठीचा प्रस्ताव पालिका प्रशासनाकडून स्थायी समिती समोर ठेवण्यात आला आहे. त्यानुसार, पोस्ट कार्यालयास प्रती बील 3 रूपये 20 पैशांचे शुल्क प्रतीबिल आगावू अदा केले जाणार असल्याचे या प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे.

महापालिकेकडून शहरात दरवर्षी नागरिकांना 1 एप्रिल पूर्वी मिळकतकराची बिले वाटली जातात. गेल्या दोन वर्षांपासून प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यापूर्वी ही बिले बचत गटांच्या माध्यमातून वाटप केली जात होती. मात्र, बिले न वाटताच टाकून देणे, ती कचर्‍यात आढळणे असे प्रकार घडल्याने प्रशासनाने ती पोस्टाच्या माध्यमातून देण्याचा निर्णय घेतला होता. पोस्टाच्या माध्यमातून परत येणार्‍या बिलांचा टक्का अवघा 1 ते 2 आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांना बिले वेळेवर मिळत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे यंदाही प्रशासनाकडून हा निर्णय कायम ठेवण्यात आला आहे.

मंगळवारी होणार निर्णय
मागील वर्षी महापालिका प्रशासनाने सुमारे 7 लाख 20 हजार बिले नागरिकांना पाठविली होती. मात्र, या वर्षी हा आकडा सुमारे 10 लाखांवर गेला आहे. महापालिकेकडून शहरात सुरू असलेल्या जीआयएस मॅपिंगच्या प्रकल्पामुळे सुमारे दिड लाख नवीन मिळकतींची नोंदणी महापालिकेकडे झालेली आहे. तर नवीन 11 गावांमध्ये सुमारे 1 लाख 20 हजार मिळकतींची नोंद आहे. त्यामुळे महापालिकेच्या मिळकतकर विभागाकडील नोंदणीचा आकडा तब्बल 10 लाखांच्यावर जाणार आहे. त्यामुळे या बिलांच्या वाटपासाठी पोस्टास आवश्यक असलेली रक्कम आगावू देण्यासाठी 2017-18 च्या अंदाजपत्रकात तरतूद उपलब्ध करून देण्याचे प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे. येत्या मंगळवारी होणार्‍या स्थायी समितीच्या बैठकीत त्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.