करसंकलन विभागामार्फत थकबाकीदारांना आवाहन
15 ऑक्टोबरपूर्वी संपूर्ण कर भरल्यास शास्तीत 90 टक्के सवलत
पिंपरी-चिंचवड : शहरातील मिळकतकर थकबाकीदारांसाठी करसंकलन विभागामार्फत 1 ऑक्टोबरपासून मनपाकर शास्ती (दंड) रक्कमेमध्ये सवलत देण्याची अभय योजना राबविणण्यात येत आहे. थकबाकीदारांनी 15 ऑक्टोबरपूर्वी संपूर्ण कराची रक्कम भरणा केल्यास मनपा शास्ती कराच्या रक्कमेवर 90 टक्के सवलत देण्यात येणार आहे. जे मिळकतधारक मिळकत कराचा भरणा करणार नाहीत, अशा मिळकतींवर जप्तीची कारवाई करण्यात येणार असल्याचीही माहिती दिली आहे.
हे देखील वाचा
16 ऑक्टोबरनंतर 75 टक्के
मुदतीत मिळकतकर न भरणार्या मिळकतधारकांना दरमहा 2 टक्के दराने बिलामध्ये मनपाकर शास्ती (दंड) म्हणून आकारण्यात येत आहे. मिळकतकराची थकबाकीसह संपूर्ण रक्कम भरणा करणार्या मिळकतधारकांसाठी अभय योजना आहे. 15 ऑक्टोबरपूर्वी संपूर्ण कराची रक्कम भरणा करतील त्यांना एकूण मनपाकर शास्ती (दंड) रक्कमेच्या 90 टक्के सवलत देण्यात येणार आहे. तसेच, 16 ते 31 ऑक्टोबर या कालावधीमध्ये भरणा करणा-या मिळकतधारकांना मनपाकर शास्ती (दंड) रक्कमेचे 75 टक्के सवलत देण्यात येणार आहे. तसेच, मिळकतकराचा ऑनलाईन पद्धतीने एक रक्कमी भरणा करणार्या मिळकतधारकांसाठी सामान्य करात 2 टक्के सुट लागू आहे.
जप्तीपूर्व नोटीसीची कार्यवाही
मनपा दप्तरी आजअखेर एकूण 4 लाख 95 हजार 972 मिळकतींची नोंद झाली आहे. त्यापैकी 2 लाख 33 हजार 475 मिळकतधारकांनी 269 कोटी 55 लाख रुपये मिळकत कर भरणा केला आहे. ज्या मिळकतधारकांनी मिळकतकर भरणा करणेकामी मागणी नोटीस बजावूनही अद्याप कराचा भरणा केला नाही, अशांना मिळकत जप्तीपूर्वीची नोटीस बजाविण्याची कार्यवाही लवकरच सुरु करणेत येणार आहे.