दोन अधिकार्यांवर निलंबनाची कारवाई; विभागप्रमुखांना ‘कारणे दाखवा’ नोटीस
पुणे : मिळकतकराच्या वसुलीत टाळाटाळ करणार्या दोन अधिकार्यांना निलंबित केल्यानंतर विभागप्रमुखांना झळ बसली आहे. कर वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी होणारे प्रयत्न तोकडे पडत असल्याने मिळकतकर विभागप्रमुखांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजाविण्यात आली आहे.
पालिकेने 2018-19 या आर्थिक वर्षात मिळकतकरातून दोन हजार कोटी रुपये जमा होतील, असे गृहित धरले होते. आर्थिक वर्ष संपण्यास अवघे दोन महिने शिल्लक असताना,कराच्या उत्पन्नाने नुकताच एक हजार कोटींचा टप्पा ओलांडला. अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी नुकत्याच घेतलेल्या आढावा बैठकीत थकबाकीसह कर संकलनाचेप्रमाण 30 टक्क्यांपर्यंत पोहोचले नसल्याचे समोर आले. त्यामुळे, कर संकलनासाठी खात्याकडून होणारे प्रयत्न कमी पडत असून, त्याची जबाबदारी निश्चित करून मिळकतकर विभागप्रमुखांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजाविण्यात आली आहे. पुढील सात दिवसांत त्याचा खुलासा करण्याचे आदेश देण्यात आले असून, वेळप्रसंगी शिस्तभंगाच्या कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. पालिका हद्दीत चालू वर्षात नव्याने कर आकारणी झालेल्या मिळकतींकडून कर संकलन होणे गरजेचे होते. या मिळकतींकडून अपेक्षित करवसुली करण्यात खात्यालाअपयश आले आहे.
थकबाकी वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्याआधी किमान करआकारणी निश्चित झालेल्या मिळकतींकडून तरी अपेक्षित कर गोळा होणे आवश्यक होते. पेठ निरीक्षकांनीकरवसुलीचे वार्षिक 10 टक्के उद्दिष्ट पूर्ण केले नसल्याने अशा दोन अधिकार्यांना निलंबित करण्यात आले होते. कर वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट दिसत आहे.
अधिकार्यांमध्ये नाराजी
मिळकतकर वसुलीसाठी पालिका प्रशासनाने घेतलेल्या निर्णयांचे पडसाद पालिकेत उमटण्यास सुरुवात झाली आहे. कर वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करू न शकलेल्या अधिकार्यांच्या निलंबनाबाबत इतर अधिकार्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पालिकेच्या पदाधिकार्यांकडूनही सबुरीने घेण्याचा सल्ला अतिरिक्त आयुक्तांना देण्यात येत आहे. कराच्या थकबाकीचे आकडे नुसते फुगत चालल्यानेच एकूण वसुलीवर त्याचा परिणाम होत असूनही त्याची जबाबदारी अधिकार्यांवर टाकण्यात आल्याबाबत नापसंती व्यक्त केली जात आहे.