मिळकतींच्या जीएसआय मॅपिंग कंत्राटाची चौकशी व्हावी- सजग नागरिक मंच

0

पुणे – मिळकतींच्या जीएसआय मॅपिंग करण्यासाठी कंत्राटदाराला महापालिकेकडून अव्वाच्यासव्वा पैसे देण्यात आले आहेत त्याची चौकशी व्हावी अशी मागणी सजग नागरिक मंचने राज्याच्या मुख्य सचिवाकडे केली आहे.

पुणे महापालिकेने २०१६ साली हद्दीतील दहा लाख मिळकतींचे जीआयएस मॅपिंग करण्याचे कांम एसएएआर टेक्नॉलॉजी आणि सायबर टेक या दोन कंपन्यांना कंत्राटी पद्धतीने दिले. नऊ महिन्यात काम पूर्ण करणे अपेक्षित होते. त्याकरिता कंपन्यांनी २१६२ माणसे कामावर ठेवणे अपेक्षित होते आणि याच बाबीसाठी अन्य महापालिकांपेक्षा दुप्पट दर मंजूर केला होता.

मॅपिंगचे काम दोन वर्षात जवळपास निम्मेसुद्धा झाले नाही म्हणून पालिकेने कंत्राट रद्द केले. पण, १२००० कोटी रुपये अदा करण्यात आले. ही रक्कम अदा करताना कंत्राटातील कराराप्रमाणे२१६२ कामगारांची नेमणूक करण्यात आली होती का? याची शहानिशा केली नाही. कामगारांच्या संख्येचे प्रमाण लक्षात घेऊन वाढीव दर नक्की करण्यात आला होता त्यामुळे चौकशी करण्याची आवश्यकता होती ती झालेली नाही. फक्त २६२ कामगारांच्या हजेरीच्या रेकॉर्डवरून २१६२ कामगारांची हजेरी गृहीत धरून बिल अदा करण्यात आले आहे. शिवाय मिळकतीच्या सर्व्हेत त्याचत्याच मिळकतींचे बिल दुबार गेले आहे का? हेही तपासणे आवश्यक असताना तीही तपासणी झालेली नाही. या सगळ्या कंत्राटात पालिकेला फायदा झालेला नाही उलट पालिकेचे पैसे गेले आहेत. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी होऊन दोषी अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर कारवाई व्हावी असे सजग नागरिक मंचचे विवेक वेलणकर आणि विश्वास सहस्त्रबुद्धे यांनी सचिवांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.