मिळणार्‍या यशाने हुरळू नका!

0

मुंबई । राज्यात काही दिवसांपूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या झालेल्या निवडणुकीत भाजपला चांगले यश मिळाले. तसेच देशातील इतर राज्यांतही चांगले यश मिळत असल्याने पदाधिकारी, नेते आणि कार्यकर्ते हुरळून जात असल्याचे दिसून येत आहे. त्याचा परिणाम भाजपच्या भविष्यकालीन वाटचालीवर होऊ शकतो. त्यामुळे पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मिळणार्‍या यशामुळे अधिक हुरळून न जाता पक्ष आणि संघटनवाढीच्या दृष्टीने करत असलेले काम यापुढेही त्याच पध्दतीने सुरू ठेवावेत अशी सूचना भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी पदाधिकार्‍यांच्या बैठकीत केल्याची माहिती भाजपच्या एका वरिष्ठ पदाधिकार्‍याने दिली.

भाजप नंबर वन
तीन दिवसांच्या मुंबई दौर्‍यावर आलेल्या भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी दुपारी भाजपच्या मुख्य पदाधिकार्‍यांची चर्चगेट येथील वानखेडे स्टेडियममधील गरवारे हॉलमध्ये बैठक घेतली. त्या बैठकीत बोलताना त्यांनी वरील सूचना केली. देशातील जवळपास सर्व राज्यात भाजपला चांगले राजकीय यश मिळत आहे. त्याचबरोबर संघटनात्मक वाढही होत आहे. सद्यपरिस्थितीत भाजप देशात एक नंबरचा पक्ष ठरला असून हे स्थान भविष्यकाळातही कायम राखणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने पक्ष संघटना आणि राज्य सरकारच्या कामात समतोल असण्याची गरज असल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केल्याचे त्यांनी सांगितले.

सध्या मी पक्षाच्या संघटनवाढीसाठी देशाच्या दौर्‍यावर आलो आहे. राजकीय परिवर्तनाबरोबरच सामाजिक परिवर्तन गरजेचे आहे. त्यामुळे भाजपची संघटनात्मक वाढ करणे गरजेचे असून त्यासाठी पक्षाच्या पदाधिकार्‍यांबरोबरच राज्य सरकारनेही प्रयत्न आणि घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी ठोसपणे करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

अपेक्षांना खरे उतरा
केंद्राप्रमाणे महाराष्ट्रातही भाजपला चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे लोकांच्या अपेक्षा भाजपबद्दल मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी पक्षाबरोबरच राज्य सरकारने प्रयत्न करणे गरजेचे आहे. तसेच राज्य सरकारने घेतलेले निर्णय सर्वदूर पर्यंत पोहचविण्याची जबाबदारी पक्षाच्या पदाधिकार्‍यांवर आणि कार्यकर्त्यांवर असल्याची आठवणही त्यांनी यावेळी करून दिल्याचे त्यांनी सांगितले.

या बैठकीनंतर भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी भाजप प्रदेश कार्यकारणीच्या पदाधिकार्‍यांशी, पक्षाच्या आमदारांशी चर्चा करून पक्षाच्या कामकाजाच्या अनुषंगाने आढावा घेतला. आज शनिवारीही भाजपच्या विविध विभाग, बुथप्रमुख आणि जिल्हा पातळीवरील पदाधिकारी व विविध सेलच्या पदाधिकार्‍यांसोबत बैठक घेणार आहेत.