मुरुड-जंजिरा । प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशाला महाशक्ती बनवण्याचे ठरवले असून ‘बेटी बचाव बेटी पढाओ’च्या माध्यमातून महिलांच्या सक्षमीकरणाचे कार्य सुरू केले आहे. या कार्यात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने ‘मिशन साहसी’च्या प्रशिक्षण कार्यक्रमाद्वारे नवीन पाऊल टाकले आहे. हे प्रशिक्षण राज्यातील प्रत्येक मुलींपर्यंत पोहचविण्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी सहकार्य करेल. त्यातून सशक्त भारत, सशक्त महाराष्ट्र उभा करू, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने आयोजित ‘मिशन साहसी’ या उपक्रमाच्या प्रात्यक्षिक कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यावेळी ते बोलत होते. विद्यार्थी निधी, शिफूज मिशन प्रहार यांच्या सहयोगाने विद्यार्थी परिषदेच्या वतीने गेले महिनाभर मुंबईत विविध भागातील विद्यार्थींनीना स्वसंरक्षणाचे व हल्ल्यापासून स्वतःला वाचविण्याचे धडे देण्यात येत आहेत.
आजच्या कार्यक्रमात या प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थीनींनी आपल्या साहसी प्रशिक्षणाची प्रात्यक्षिके सादर केली.मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, महिलांचा सन्मान करणारा देशच महाशक्ती बनेल. देशात महिला व मुलींवर होणार्या अत्याचाराविरुद्ध मोठी जागृती निर्माण होत आहे. अशा प्रवृत्तीविरुद्ध लढण्यासाठी त्या सज्ज झाल्या असून त्यासाठी त्यांना अशा प्रशिक्षणाची आवश्यकता आहे. ज्या देशात अशा साहसी मुली असतील त्या देशाला प्रगतीपासून कोणीही रोखू शकत नाही. त्या देशात कितीही अत्याचारी, दुराचारी जन्मले तरी त्यांना व अशा मानसिकतेला नष्ट करण्याची ताकद या मुलींकडे आली आहे. महिला व मुलींवर होणार्या अत्याचाराविरुद्ध लढण्यासाठी प्रशिक्षण व आत्मविश्वासाची आवश्यकता आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या उपक्रमामुळे महिलांवर हल्ला करणार्या व त्यांच्या आत्मसन्मानाला ठेच पोहचविण्याचा प्रयत्न निष्फळ ठरेल, असा विश्वास आहे. हे प्रशिक्षण राज्यातील प्रत्येक विद्यार्थीनीपर्यंत पोहचविणे आवश्यक आहे. राज्यातील सर्व मुलींना अशा प्रकारचे प्रशिक्षण देण्यासाठी राज्य शासनामार्फत सर्वतोपरी मदत करू व त्यातून सशक्त महाराष्ट्र, सशक्त भारत उभा करू, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
थरारक प्रात्यक्षिके सादर
यावेळी सुमारे हजारांहून अधिक मुलींनी मिशन साहसीमध्ये घेतलेल्या प्रशिक्षणाची थरारक प्रात्यक्षिके सादर केली. एखाद्याने हल्ला केला तर कसा प्रतिकार करायचा, दुचाकीवरून छेड काढून पळून जाणार्यास कसे पकडायचे तसेच कठीण परिस्थितीचा कसा मुकाबला करायचे याचे मुलींनी प्रात्यक्षिक दाखवले. यावेळी विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय संघटन मंत्री सुनील अंबेकर, राष्ट्रीय महामंत्री आशिष चौहान, अभिनेत्री रविना टंडन, छात्र प्रमुख ममता यादव, साधना यादव, मंदार भानुसे, रवी जयस्वाल, प्रेरणा पवार आदी यावेळी उपस्थित होते.