चार संघानी नोंदविला सहभाग ; सातवीच्या मुलींचा संघ ठरला विजयी
तळोदा । येथील एस.ए.मिशन हायस्कुलमध्ये मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त हॉकी स्पर्धा घेवून राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात आला. हॉकीचे जादुगार मेजर ध्यानचंद यांचा जन्म दिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यानुसार तळोदा येथील एस.ए.मिशन हायस्कुलमध्ये आंतरशालेय हॉकी स्पर्धा घेवून क्रीडा दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून शाळेच्या मुख्याध्यापिका वेलेरिना एलिस या उपस्थित होत्या.
यावेळी स्पर्धेत चार संघांनी सहभाग नोंदविला. त्यात अंतिम सामना इयत्ता 7 वी विरुद्ध इयत्ता 10 वी मुलींच्या संघात झाला. इयत्ता सातवीच्या मुलींनी आपल्या खेळाची चुणूक दाखवत 3-0 असा पराभव करीत आपला संघाला विजय मिळवून दिला. त्यांच्या यशाबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका वेलेरिना एलिस यांनी त्यांचे अभिनंदन केले. स्पर्धेस पंच म्हणून ध्रुव महाजन व जगदिश वंजारी यांनी काम पाहिले. स्पर्धा यशस्वीतेसाठी किरण मगरे, हेमंत लोहार, निळकंठ सुर्यवंशी, राजेंद्र पाडवी, भाग्यश्री जोशी, हंसा कलाल, इमरान शेख आदींनी कामकाज पाहिले. विजयी संघास क्रीडा शिक्षक जगदिश वंजारी यांचे मार्गदर्शन लाभले.