टोकियो । प्रणव जेरी चोपडा आणि एन सिक्की रेड्डी चीवट झुंजीनंतर मिश्र दुहेरीच्या लढतीत पराभूत झाल्यामुळे भारताचे जपान ओपन सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. यावर्षी लखनऊमध्ये झालेल्या सय्यद मोदी ग्रांपी गोल्ड स्पर्धेतील मिश्र दुहेरीचे विजेतेपद मिळवणार्या प्रणव आणि सिक्कीने पहिला गेम जिंकूनसुद्धा ताकुरो होकी आणि सयाका हिरोता या स्थानिक जोडीने 21-14, 15-21, 19-21 असा विजय मिळवला रोमहर्षक ठरलेल्या सामन्यातील पहिल्या गेममध्ये भारतीय जोडीने 7-4 अशी आघाडी घेतली होती. जपानी जोडीने 9-9 अशी बरोबरी साधत रंगत वाढवली. पण या बरोबरीनंतर प्रणव आणि सिक्कीने पुन्हा आघाडी मिळवून ती कायम राखत पहिला गेम जिंकला.
ताकुरा आणि सयाकाने दुसर्या गेममध्ये मुसंडी मारताना 4-1 अशी आघाडी घेतली. त्यानंतर पहिल्या ब्रेकपर्यंत ही जोडी 11-8 अशी पुढे होती. प्रणव आणि सिक्की जोरदार लढत देत 13-15 अशी पिछाडी कमी केली. पण स्थानिक जोडीने चांगला खेळ करत दुसरा गेम जिंकून सामन्यात 1-1 अशी बरोबरी साधली. निर्णायक गेममध्ये दोन्ही जोड्यांनी तुल्यबळ खेळ करत क्रीडाप्रेमींना चांगल्या खेळाची मेजवानी दिली. दोन्ही जोड्या 8-8 अशा बरोबरीत होत्या. पण त्यानंतर जपानी जोडीने 13-9 अशी आघाडी घेतली. या गुणसंख्येनंतर दोन्ही जोड्यांनी आक्रमक खेळ केला. पण ताकुरो आणि सयाकाने 20-19 अशा गुणसंख्येवर मॅचपाईंट मिळवत सामन्याचे पारडे आपल्या बाजूने झुकवले आणि अंतिम फेरीत स्थान मिळवले.