मिश्र संघाच्या शिफारशीमुळे नेमबाजीला जोरदार धक्का बसेल

0

नवी दिल्ली : भविष्यात आॅलिम्पिकसाठी आयएसएसएफ अ‍ॅथलिट आयोगाच्या मिश्र संघाच्या शिफारशीला वैश्विक संस्थेने मान्यता दिल्यास त्याचा नेमबाजीच्या वातावरणाला जोरदार धक्का बसेल, असे आॅलिम्पिक कांस्यपदक प्राप्त नेमबाज गगन नारंगने म्हटले आहे. नेमबाजीमधील काही प्रकारात २०२० च्या ऑलिम्पिकपासून पुरुष दुहेरीऐवजी मिश्रदुहेरी विभागाचा समावेश करण्याची शिफारस आंतरराष्ट्रीय नेमबाजी महासंघाच्या खेळाडू समितीने सुचविली आहे. पण हा बदल खेळाडूंच्या दृष्टीने अयोग्य असून त्यामुळे समानता राहणार नाही, असे नारंगने सांगितले.

अभिनव बिंद्राने केले आहे समर्थन

डबलट्रॅपच्या पुरुष दुहेरीऐवजी मिश्रदुहेरी, पुरुषांचा ५० मीटर प्रोनऐवजी मिश्रदुहेरी एअर रायफल तसेच पुरुषांच्या ५० मीटर पिस्तूलऐवजी मिश्रदुहेरी एअरपिस्तूल असे बदल सुचविण्यात आले आहेत. नेमबाजीतील या प्रस्तावित बदलाला खेळाडूंमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटली आहे. ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नेमबाज अभिनव बिंद्राने मात्र या बदलांची शिफारस योग्य असल्याचे मत व्यक्त केले आहे. नारंग म्हणाला, ‘‘पूर्ण जगात प्रोन स्पर्धा खूप लोकप्रिय आहे आणि ते हटवल्यास जे नेमबाज फक्त प्रोनमध्येच नेमबाजी करीत आहेत, ते बाहेर होतील. त्याचप्रमाणे ५० मीटर प्रोन आणि ५० मीटर पिस्टलसाठी आवश्यक साहित्य तयार करणाऱ्या कंपन्यांना ते साहित्य बंद लागेल.’’

नारंगचा बदलांना विरोध

नारंग याने या बदलांना विरोध करीत सांगितले की, ‘या बदलांमुळे पुरुष व महिलांच्या कामगिरीवर अनिष्ट परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रोन हा प्रकार जागतिक स्तरावर खूप लोकप्रिय प्रकार आहे. जर हा प्रकार वगळला तर अनेक खेळाडूंना त्यांचे कौशल्य दाखविण्याची संधी मिळणार नाही. त्याचबरोबर नेमबाजी साहित्याचे उत्पादन करणाऱ्या उद्योजकांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळण्याची शक्यता आहे. ऑलिम्पिकमध्ये सध्या नेमबाजीत पुरुषांकरिता नऊ तर महिलांकरिता सहा क्रीडा प्रकारांचा समावेश आहे. पुरुष व महिला यांच्यात समानता आणण्यासाठी प्रस्तावित बदल सुचविण्यात आले आहेत.’

पदक मिळविण्याचा प्रयत्न

नारंग पुढे म्हणाला की, ‘२०१२ मध्ये लंडन येथील ऑलिम्पिकमध्ये १० मीटर एअर रायफलमध्ये मला कांस्यपदक मिळाले होते. त्यानंतर दुखापतींमुळे मी या क्रीडा प्रकारात भाग घेतला नव्हता. मात्र पुढच्या ऑलिम्पिकमध्ये पुन्हा त्या क्रीडा प्रकाराकरिता मी नशीब आजमावणार आहे. नवी दिल्ली येथे होणाऱ्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत मात्र मी फक्त ५० मीटर प्रोन प्रकारात भाग घेत आहे. घरच्या प्रेक्षकांसमोर या स्पर्धेत पदक मिळविण्याचा माझा प्रयत्न राहील.’