मिसबाह-उल-हकची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा

0

लाहोर । पाकिस्तान क्रिकेटला नवी उंची प्रदान करणार्‍या कसोटी संघाचा कर्णधार मिसबाह-उल-हक याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तान संघाच्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेनंतर निवृत्ती घेणार असल्याची माहिती मिसबाहने दिली आहे. लाहोरच्या गडाफी स्टेडियम येथे पत्रकार परिषद घेऊन मिसबाहने आपल्या निवृत्तीबाबतची माहिती दिली. वेस्ट इंडिजविरुद्धची कसोटी मालिका ही माझ्या कसोटी करिअरमधील शेवटची मालिका असणार आहे. स्थानिक पातळीवर मी यापुढेही क्रिकेट खेळत राहिन. स्थानिक क्रिकेटमध्ये खेळणे केव्हा थांबवायचे हे अद्याप ठरवलेले नाही, असे मिसबाहने पत्रकार परिषदेत सांगितले. बुधवारी विस्डेनच्या वर्षातील 5 सर्वश्रेष्ठ क्रिकेटपटूंमध्ये मिसबाहचा समावेश झाला होता. कसोटी क्रिकेटमध्ये पाकिस्तान संघाच्या निराशाजनक प्रदर्शनामुळे त्याच्या कर्णधारपदावर टीका होत होती.

21 एप्रिलपासून पाकिस्तान तीन कसोटी सामने खेळण्यासाठी वेस्टइंडीज दौ-यावर जाणार आहे. ही मिसबाहची अंतिम मालिका असणार आहे. मिसबाहच्या कर्णधार काळात पाकिस्तानच्या कसोटी संघाला कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच क्रमवारीत अव्वल स्थान गाठता आले होते. मिसबाहने पाकिस्तानसाठी आजवर अनेक सामने आपल्या आश्वासक फलंदाजीने जिंकून दिले आहेत. दरम्यान, मिसबाहने आता नवनिर्वाचित कर्णधार सरफराज अहमद याला प्रोत्साहन देण्याची गरज देखील व्यक्त करत क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात एकच कर्णधार असावा या कल्पनेला पाठिंबा दिला आहे. सरफराजवर दबाव आणण्यापेक्षा त्याला पाठिंबा देण्याची गरज आहे. क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात पाकिस्तानच्या संघाचे नेतृत्त्व एकाच खेळाडूकडे असावे असे मलाही वाटते. त्यामुळे सरफराझला आपण सर्वांनी पाठिंबा द्यायला हवा. तो संघाला खूप चांगली दिशा देऊ शकतो, असे मिसबाह म्हणाला. पाकिस्तानला कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानी पोहोचवल्यानंतर अनेक सामन्यांमध्ये पाकिस्तानला पराभव पत्कारावा लागला. नुकतंच सलग सहा कसोटी सामने हारण्याची नामुष्की पाकिस्तानवर आली. न्यूझीलंडविरूद्ध 2-0 ने तर ऑस्ट्रेलियाविरूद्ध 3-0 ने त्यांचा पराभव झाला होता. तसंच स्वतः मिसबाहच्या खेळातील सातत्यही कमी झाले होते. त्यामुळे मिसबाहने निवृत्ती घेतल्याची चर्चा आहे.