मुंबई – मिसिंग झालेली पंधरा वर्षांची मुलगी कुर्ला परिसरात सापडल्याने तिच्या पालकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. रागाच्या भरात ही मुलगी घरातून निघून गेल्याने तिच्या पालकांनी सांताक्रुज पोलिसांत तक्रार केली होती. याप्रकरणी अपहरणाचा गुन्हा नोंद होताच दुसर्या दिवशी ती सापडली. तिचे कोणीही अपहरण केले नसून ती स्वतहून गेल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. त्यामुळे अपहरणाचा गुन्हा आता रद्द होईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले. सांताक्रुज येथील एका एसआरए इमारतीमध्ये ही मुलगी तिच्या पालकांसोबत राहते. ती प्रचंड रागीट असून क्षुल्लक वादातून तिला प्रचंड राग येतो. दोन दिवसांपूर्वी क्षुल्लक कारणावरुन तिचे तिच्या पालकांशी भांडण झाले ोते.
या भांडणानंतर ती रागाच्या भरात घरातून निघून गेली होती. राग शांत झाल्यावर ती परत घरी येईल असे तिच्या पालकांना वाटत होते. मात्र रात्री उशिरापर्यंत ती घरी परत आली नाही. त्यामुळे तिच्या पालकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला, मात्र ती कुठेच सापडली नाही. त्यानंतर त्यांनी उशिरा सांताक्रुज पोलीस ठाण्यात जाऊन घडलेला प्रकार सांगितला आणि तिच्या मिसिंगची तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा नोंदवून तिचा शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असतानाच ती दुसर्या दिवशी सकाळी पोलिसांना कुर्ला परिसरात सापडली. तिला कुर्ला पोलीस ठाण्यात आणल्यानंतर ती सांताक्रुज येथे राहत असल्याचे उघडकीस आले. त्यानंतर कुर्ला पोलिसांनी सांताक्रुज पोलिसांशी संपर्क साधला असता ती मुलगी मिसिंग असल्याचे कुर्ला पोलिसांना समजले. या माहितीनंतर सांताक्रुज पोलिसांनी तिचा ताबा घेऊन तिला तिच्या पालकांकडे सोपविले. या मुलीची जबानी नोंदविण्यात आली असून ती रागातून घरातून निघून गेल्याचे सांगितले. तिचे कोणीही अपहरण केले नव्हते. या जबानीनंतर पोलिसांनी आता अपहरणाचा गुन्हा रद्द करण्याचा निर्णय घेतला असून लवकरच तशी माहिती वांद्रे येथील स्थानिक महानगर दंडाधिकारी न्यायालयात सादर केली जाणार आहे.