मीरा रोड । मीरारोडच्या गंधर्व बारवर पोलिसांनी टाकलेल्या छाप्प्यात 7 बारबाला सापडल्या आहेत. विशेष म्हणजे बारच्या भिंतीला पाडण्यात आलेल्या भगदाडातून मागील निवासी इमारतीत या बारबाला लपत असल्याची धक्कादायक माहिती या छाप्प्यादरम्यान उघडकीस आली आहे. मीरारोडच्या मुख्य मार्गावर लिना हाईट्स इमारतीच्या समोर गंधर्व हा बार आहे. नया नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक वैभव शिंगारे तसेच अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेचे सहाय्यक निरीक्षक संजय बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने गंधर्व बारवर छापा टाकला.
बारबालांसह बार व्यवस्थापक, वेटर, कर्मचार्यांविरोधात गुन्हा
बारमध्ये बनवलेल्या गुप्त खोलीत दोन बारबाला ताब्यात घेण्यात आल्या. तर बारच्या मागील भिंतीला पडलेल्या भगदाडातून लिना हाईट्स इमारतीच्या आवारात लपून बसलेल्या 5 बारबालांनाही ताब्यात घेण्यात आल्या. याप्रकरणी नया नगर पोलिसांनी 7 बारबालांसह बारचा व्यवस्थापक, वेटर आदी 7 ते 8 कर्मचारी तसेच बारमध्ये बसलेल्या 5 ते 6 ग्राहकांवर गुन्हा दाखल कारवाई केली आहे.
वारंवार पाठपुराव्यानंतर रहिवाशांच्या तक्रारींकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
गंधर्व बारमुळे येथील रहिवाशांनी मीरा-भाईंदर महानगरपालिका व नया नगर पोलीस ठाण्यास पत्र देऊन गंधर्व बारवर कारवाईची मागणी केली होती. त्यामध्ये बारचालकाने बारच्या मागील भिंतीला भगदाड पाडून इलॅक्ट्रोनिक दार लावल्याचेही नमूद करण्यात आले होते. तसेच छापा पडल्यानंतर बारबाला आमच्या इमारतीच्या आवारात शिरुन लपून बसल्याचा आरोपही त्यांनी केला होता. मात्र तरीही प्रशासनाने रहिवाशांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केले होते.