नवी दिल्ली : राष्ट्रपती निवडणुकीसाठी संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए)च्या उमेदवार मीरा कुमार यांनी बुधवारी आपले नामांकन दाखल केले. याप्रसंगी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, माकपचे महासचिव सीताराम येचुरी यांच्यासह यूपीएतील वरिष्ठ नेत्यांची उपस्थिती होती. 30 जूनपासून मीरा कुमार या साबरमती येथून आपल्या प्रचार अभियानाला सुरुवात करणार आहेत.
मीरा कुमार यांच्या नावाचा प्रस्ताव काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी ठेवला होता. त्याला यूपीएतील सर्वच घटकपक्षांनी मान्यता दिली. राष्ट्रपती निवडणुकीसाठी दाखल झालेल्या नामांकन अर्जांची गुरुवार (दि.29) पडताळणी होणार असून, 17 जुलैरोजी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत सत्ताधारी एनडीएचे उमेदवार रामनाथ कोविंद यांची यूपीएच्या उमेदवार मीरा कुमार यांच्याशी लढत होणार आहे. ही निवडणूक विचारधारेची असल्याचे वक्तव्य नुकतेच श्रीमती कुमार यांनी केले होते. तर ही निवडणूक दलितविरुद्ध दलित होत असल्याचा सूर प्रसारमाध्यमांतून उमटत आहे. दरम्यान, केंद्रीयमंत्री एम. व्यंकय्या नायडू यांनी रामनाथ कोविंद यांच्या नामांकन पत्राचा आणखी एक दस्तावेज बुधवारी दाखल केला. याप्रसंगी वायएसआर काँग्रेसचे एम. राजमोहन रेड्डी यांचीदेखील उपस्थिती होती.