मीरा-भाईंदर महापालिकेत कमळ फुलले

0

मीरा-भाईंदर । भाजप आणि शिवसेना यांच्यातील वर्चस्वाच्या लढाईमुळे अटीतटीच्या झालेल्या मिरा-भाईंदर महानगरपालिका निवडणुकीचा निकाल सोमवारी जाहीर झाला. शिवसेना- भाजप आणि काही अंशी काँग्रेसमुळे या निवडणुकीत चुरस निर्माण होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, ही अपेक्षा सपशेल फोल ठरली. मिरा-भाईंदर महापालिकेच्या मागील निवडणुकीत अवघ्या 29 जागा जिंकणार्‍या भाजपने या निवडणुकीत तब्बल तिप्पट जागा जिंकत शिवसेना आणि काँग्रेसच्या मनसुब्यांना लगाम घातला.

निखळ यश
मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या एकूण 95 जागांपैकी 61 जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत. पालिकेत सत्तास्थापनेसाठी 48 जागांची गरज होती. मात्र, भाजपने पूर्ण निकाल जाहीर होण्यापूर्वीच हा आकडा ओलांडला होता. तर दुसरीकडे भाजपला जोरदार आव्हान देणार्‍या शिवसेनेला केवळ 22 जागांवर समाधान मानावे लागले. मात्र, गेल्या निवडणुकीत भाजपसोबत युती करुनही शिवसेनेला 14 जागा मिळाल्या होत्या. त्या तुलनेत यंदा स्वबळावर लढूनही 22 जागांवर विजय मिळणे, ही शिवसेनेसाठी समाधानाची बाब म्हणावी लागेल.

इतरांची वाताहत
देशपातळीवर घरघर लागलेल्या काँग्रेसची या निवडणुकीतही काही प्रमाणात पिछेहाट झाली आहे. भाजपच्या झंझावातामुळे अगदी अखेरच्या सत्रापर्यंत शिवसेना आणि काँग्रेसच्या उमेदवारांची संख्या 10च्या वर जाईल किंवा नाही, याबद्दल शंका वाटत होती. परंतु अखेरच्या सत्रात दोन्ही पक्षांनी काही प्रमाणात ही पिछाडी भरून काढली. मात्र, काँग्रेसला दहा जागांपर्यंतच मजल मारता आली. उर्वरित एका जागेवर अपक्ष उमेदवाराचा विजय झाला. तर मनसे आणि बहुजन विकास आघाडीचा या निवडणुकीत पुरता फज्जा उडाला.