मीरा रोड । आपल्या देशात असंख्य लोकांना अवयवाची प्रतिक्षा आहे. किडनी, हृदय, कॉर्निया, त्वचा व स्वादुपिंड आदींची यादी बरीच मोठी असून हे अवयव न मिळ्याल्यामुळे हजारो लोक मृत्युमुखी पडत आहेत. ‘मरावे परी, अवयवदान रुपी उरावे’ या संकल्पनेनुसार सामाजिक बांधिलकीतून आपण इतरांना जीवनदान देऊ शकतो ही भावना जनमानसात वाढविण्यासाठी मीरा रोड येथील वोक्हार्ट हॉस्पिटलतर्फे मीरा भायंदर प्रॉपर्टी डीलर्स असोसिएशन च्या सभासादांकरिता ’अवयवदान हेच खरे जीवनदान’ या विषयावर 7 नोव्हेंबर रोजी हॉस्पिटलमध्ये एक कार्यशाळा आयोजित केली होती.
कार्यशाळेत वोक्हार्ट हॉस्पिटलच्या डॉक्टर व अवयवदानाच्या टीमने भारतातील अवयवदानाची सद्यपरिस्थितीची आकडेवारी उपस्थितांना दिली. अवयवदानाचे प्रमाण कमी राहण्याची नेमकी कारणे कोणती? अवयवदानाचा खर्च झेपेल का ? समाजात याबाबत गैरसमज आहेत का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे यावेळी नागरिकांना देण्यात आली. यावेळी एकूण 80 नागरिकांनी अवयवदानासाठी पुढाकार घेतला असून आपल्या मित्र व कौटुंबिक परिवारामध्ये अवयवदानाचा प्रचार व प्रसार करण्याची शपथ घेतली.
नागरिकांच्या शंकांचे केले निरसन
आज सामाजिक दायित्व दाखवून अवयवदानासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे. देश, समाज हा आपला परिवार आहे, असे वोक्हार्ट हॉस्पिटलचे केंद्र प्रमुख रवी हिरवानी यांनी सांगितले. ते म्हणाले मरणोत्तर नेत्रदान, त्वचादान, किंवा अवयवदान केल्यामुळे जर अन्य कोणा गरजूला जीवनाची अनुभूती घेता येऊ शकेल तर त्यापेक्षा कोणते श्रेष्ठ दान असूच शकत नाही ही भावना आजच्या नागरिकांमध्ये वाढीस लागणे ही काळाची गरज आहे. मीरा भायंदर प्रॉपर्टी डीलर्स असोसिएशनच्या सभासदांनी व आलेल्या इतर मान्यवरांनी अवयवदानाचा फॉर्म भरून अवयवदानची शपथ घेतली.