धुळे । मार्च महिन्यातच मे हिटचा तडाखा बसत असतांना विज कंपनीने भर दुपारी मील परिसरात विजेचे भारनियमन सुरु केले आहे. यामुळे नागरिकांना त्रास होत असून हे भारनियमन बंद करावे, अन्यथा वेळ बदलावी अशी मागणी नगरसेवक अमोल मासुळे यांनी केली आहे. परिसरातील नागरिकांना सोबत घेवून त्यांनी विज वितरण कंपनीच्या रामवाडी युनिटचे प्रमुख असलेल्या अधिकार्यांना लेखी निवेदन दिले आहे.
नागरिकांना होतोय त्रास
या निवेदनात उन्हाचा पारा 40 अंश पार करुन गेला आहे. मार्चमध्येच तापमान 43 अंशावर पोहोचल्याने जीवाची काहीली होत आहे. जिल्हा प्रशासनानेही उष्णतेची लाट येणार असल्याचे सांगून नागरिकांना उन्हात बाहेर न पडण्याची खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. असे असताना मील परिसरात दु.12 ते 4 या वेळेत भारनियमन केले जात असून त्याचा नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे. एकीकडे उन्हाचा त्रास तर दुसरीकडे विजे वाजून होणारी होरपळ यामुळे जनता त्रासली आहे. त्यामुळे हे भारनियमन त्वरीत बंद करावे, अन्यथा त्याची वेळ सकाळी 6 ते 9 असावी, अशी मागणी या निवेदनात केली आहे. निवेदन देतांना नगरसेवक अमोल मासुळे यांच्यासमवेत मिनाबाई देशमुख, रत्नाबाई सूर्यवंशी, संगीताबाई सोनवणे, मीनाबाई ठाकूर, महेश थोरात, भैया पाटील,रवी सोनवणे, गोंविदा सोनवणे, गणेश पवार, नंदू भामरे, जितेंद्र आढावे, दादा पाटील, बंटी गोसावी, बापूजी मराठे, जगदीश शिंदे, गोपिनाथ चित्ते, बबलू सूर्यवंशी, नितीन आखाडे, चंदू पाटील आदी उपस्थित होते.