पुणे : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांच्यात व माझ्यात दुरावा निर्माण झाल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून येत आहेत. पण त्यात तथ्य नाही. येत्या काही दिवसांत मी त्यांची भेट घेणार आहे, असे कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी शुक्रवारी येथे सांगितले.
सांगली जिल्ह्यात जिल्हा परिषद निवडणुकीत सदाभाऊ खोत यांच्या मुलाला उमेदवारी देण्यात आल्याने राजू शेट्टी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. या मुद्द्यावरून खोत व शेट्टी यांच्यातील मतभेद चव्हाट्यावर आले होते. खोत यांचे चिरंजीव निवडणुकीत पराभूत झाल्यानंतरही या दोन्ही नेत्यांतील मतभेद दिसून आले होते. या पार्श्वभूमीवर हे दोन्ही नेते शुक्रवारी पुण्यात एकमेकांना भेटणार का याची उत्सुकता होती.
पणन महामंडळाच्या बैठकीसाठी सदाभाऊ खोत पुण्यात आले होते. या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली. खासदार राजू शेट्टीही शुक्रवारी पुण्यात होते. तुम्ही त्यांना भेटणार का, असा प्रश्न केला असता त्यांनी वरील उत्तर दिले.
सदाभाऊ खोत म्हणाले, निवडणुकांची आचारसंहिता संपल्याने सातारा व सांगली जिल्ह्याची नियोजन बैठक आजच होत आहे. त्यामुळे मला शेट्टी यांना भेटता येणार नाही. आम्ही राहायला जवळ आहोत. त्यामुळे वेळ मिळाला की भेटणार आहे. तसेच, माझ्यात आणि राजू शेट्टी यांच्यात कोणताही दुरावा नाही.
सदाभाऊंनी बदलले गेस्ट हाऊस
सदाभाऊ खोत व राजू शेट्टी यांनी सरकारी विश्रामगृहातील खोल्या आरक्षित केल्या होत्या. मात्र, याच विश्रामगृहात शेट्टी यांनी खोली आरक्षित केल्याचे समजताच शेट्टी यांनी आपले आरक्षण रद्द करत पाटबंधारे खात्याच्या विश्रामगृहात जाणे पसंत केले. त्यावरूनही या दोन्ही नेत्यांतील कटुता अद्याप कायम असल्याचे दिसून आले.