माजी मंत्री एकनाथराव खडसे पुन्हा गरजले ; भाजपा ठरू नये ‘वाल्यांचा’ पक्ष
भुसावळ (गणेश वाघ)- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना दैनिकाच्या संपादकीय अग्रलेखात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा आरतीबाज असा उल्लेख केला होता तर एकनाथराव खडसे हे विरोधी पक्ष नेते व नंतर मंत्री असताना ते अंगात संचारल्यागत बोलत-वावरत होते व ‘पॉवरबॉज’ अशी त्यांची प्रतिमा होती मात्र मुख्यमंत्र्यांनी खडसेंची पॉवर काढून घेतल्याने खडसे आता मुक्ताईनगरात वाती वळत असल्याची टिका ठाकरे यांनी केली होती. या प्रश्नी गुरुवारी भुसावळ येथे खान्देश महोत्सवानिमित्त आलेल्या माजी मंत्री खडसे यांना छेडले असता ते म्हणाले की, उद्धव ठाकरे यांच्या मताशी मी निश्चितच सहमत असून सध्या मी वातीच ओळतोय मात्र वात उजेड देण्याचेही काम करते व आग लावण्याचेही काम प्रसंगी करते, असा मार्मिक टोलाही त्यांनी हाणला. धुळे महापालिकेच्या निवडणुकीत पक्षाने खडसेंना दूर सारल्याने या विषयावर त्यांनी कदाचित मी ‘आरतीबाज’ नेता नसल्याने झाले असावे, अशी कोपरखळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजनांचे नाव न घेता लगावली.
उद्धव ठाकरेंच्या मताशी आपण सहमत
बुधवार, 5 डिसेंबरच्या अंकात ‘दैनिक जनशक्ती’ने ‘आरतीबाज महाजनांसह पॉवरबाज खडसेंवर उद्धव ठाकरेंची टिका’ या आशयाचे वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्ताचा संदर्भ खडसे यांना देत ठाकरेंनी केलेल्या टिकेविषयी विचारले असता ते म्हणाले की, गिरीश महाजनांबद्दल मी काही सांगू शकत नाही मात्र उद्धवजींच्या मताशी मी निश्चितच सहमत आहे. मी सध्या वाती वळण्याचे काम सुरू केले आहे मात्र पक्षात तब्बल 40 वर्ष पक्षनिष्ठेने काम केल्याने यापुढेही पक्षासाठी झटणार असून पक्षाने दिलेली जवाबदारी नेटाने पार पाडणार आहे. कुठल्याही काम करणार्या नेत्याला निश्चित घरी बसणे आवडणार नाही, असे सांगून ते म्हणाले की, वातीचे काम उजेड देणे असलेतरी प्रसंगी ती आगही लावू शकते व कुठेही लावू शकते, असे सूचक विधानही केले.
मी आरती ओवाळणारा नसल्याने माझी गरज नसावी
धुळे महापालिका निवडणुकीत खडसेंना दूर सारल्याबाबत खडसेंना विचारले असता ते म्हणाले की, कदाचित मी आरती ओवाळणारा नसल्याने कदाचित माझी पक्षाला गरज नसावी त्यामुळे मला बाजूला सारण्यात आले आहे. खडसेंचा बॅनरचवर फोटोदेखील नाही याबाबतही त्यांना छेडले असता खडसे यांनी अत्यंत मार्मिकपणे उत्तर देत सांगितले की, माझा फोटो लावल्याने कदाचित भाजपाला मते मिळणार नसतील, असा नेत्यांना समज असल्यानेच असे झाले असावे, असे ते म्हणाले.
भाजपा होवू नये ‘वाल्यां’चा पक्ष
धुळे महापालिका निवडणूक गुंडागर्दी तसेच भाजपात आयत्यावेळी दिलेल्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांच्या प्रवेशावरून गाजत असल्याबाबत खडसे यांना छेडले असता ते म्हणाले की, आमच्या पक्षात कुणाला प्रवेश द्यावा याबाबत पक्षश्रेष्ठींनी धोरण ठरवले आहे. आमच्या पक्षात बाहेरचा कुणी ‘वाल्या’ आल्यानंतर त्याचा वाल्मिकी होतो मात्र वाल्यांच्या टोळ्यांचा आता भाजपा पक्ष होवू नये, अशी आशाही खडसेंनी व्यक्त करीत पक्षाचे कान टोचले तर असे असलेतरी पक्षात त्यांना आम्ही घडवू, असा चिमटाही त्यांनी काढला.
समय बडा बलवान ; खडसेंचे सूचक वक्तव्य
पक्षासाठी आयुष्यभर झिजलेल्या खडसेंना अडवाणींच्या रांगेत बसवले जात असून त्यांना अडगळीत टाकून त्यांच्यावर अन्याय केला जात आहे याबाबत खडसेंना छेडले असता ते म्हणाले की, ‘समय बडा बलवान है’, असे सूचक विधान करून त्यांनी प्रभू रामांचा संदर्भ देत रामालाही जेथे 14 वर्ष वनवासात जावे लागले तेथे मी तर सर्वसामान्य माणूस असल्याचे भावनाविवश उद्गारही त्यांनी काढले.