लंडन: भारतीय बँकांना हजारो कोटींचा चुना लावून परदेशात फरार झालेल्या मद्यसम्राट विजय मल्ल्याची संपत्ती जप्त करण्याची कामगिरी सरकार करीत आहे. दरम्यान आता मल्ल्याची बँक खाती ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. परंतु मल्ल्याकडून या प्रक्रियेवर स्थगिती आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. मल्ल्याने कोर्टात त्याची बाजू मांडत ‘माझ्याकडे पैसे नाहीत. पत्नीच्या पैशावर माझा उदरनिर्वाह चालतो. पर्सनल असिस्टंट, ओळखीचे उद्योजक आणि मुलांकडून मला उधारी घ्यावी लागते, असे सांगत आपली बँक खाती गोठवली जाऊ नयेत, अशी विनवणी मल्ल्याने केली आहे.
ज्या १३ बँकांचे मल्ल्याने ११ हजार कोटी रुपये थकविले आहेत, त्या बँकांनी गेल्यावर्षी ११ सप्टेंबर रोजी त्याच्या विरोधात कोर्टात दिवाळखोरी याचिका दाखल केली आहे. त्यावर येत्या डिसेंबरमध्ये सुनावणी होणार आहे. बँकांच्या याच याचिकेवर एका प्रश्नाला उत्तर देताना त्यानं कोर्टापुढे बँक खाती न गोठवण्याची आणि दिवाळखोर जाहीर न करण्याची विनंती केली आहे. माझी व्यक्तिगत संपत्ती २,९५६ कोटी रुपये एवढी राहिली आहे. बँकांशी सेटलमेंट करण्यासाठी या संपूर्ण संपत्तीची माहिती कर्नाटक उच्च न्यायालयासमोर सादर केली असल्याचे त्याने सांगितले आहे. बँकांनीही मल्ल्याकडून मिळालेली ही माहिती यूके कोर्टाला दिली आहे.
पत्नीची कमाई १.३५ कोटी
मल्ल्याची पत्नी पिंकी ललवाणी वर्षाला सुमारे १.३५ कोटी रुपये कमावते. त्याची पर्सनल असिस्टंट महल आणि एक ओळखीचा उद्योगपती बेदीकडून त्याने अनुक्रमे ७५.७ लाख आणि १.१५ कोटी रुपये उधार घेतले आहेत, अशी माहिती बँकांनी कोर्टाला दिली आहे. तर उदरनिर्वाह चालविण्यासाठी आणि काही कर्ज फेडण्यासाठी हे पैसे उधार घेतले आहेत, असं मल्ल्याने कोर्टाला सांगितलंय. मल्ल्याने ब्रिटीश सरकारचे करापोटीचे २.४० कोटी रुपये थकविले आहेत. तसेच माजी वकील मॅकफर्लेंस यांची फी सुद्धा मल्ल्याने थकविल्याचे अॅड. निजेल तोजी यांनी कोर्टापुढे स्पष्ट केले आहे. मल्ल्याचा दर आठवड्याचा खर्च १६.२१ कोटी एवढा आहे. मात्र त्याने उदरनिर्वाहासाठीच्या या खर्चात कपात करणार असून आता तो दर महिन्याला २६.५७ कोटी रुपये खर्च करणार असल्याचं त्याचे वकील जॉन ब्रिसबी यांनी बुधवारी यूके कोर्टाला स्पष्ट केलं आहे.