मी कुणालाही त्रास दिलेला नाही ः आमदार अ‍ॅड. गौतम चाबुकस्वार

0

पिंपरी चिंचवड ः गेल्या पाच वर्षात आपण शांतपणे जनतेचे प्रश्‍न सोडविण्यावर भर दिला. जनतेचा विश्‍वास संपादन केला. आपल्याकडे आलेल्याचे कामे मार्गी लावलीत. त्यामुळे मी कुणालाही त्रास दिलेला नसल्याचे उद्गार आमदार अ‍ॅड. गौतम चाबुकस्वार यांनी काढले. या विधानावर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. पिंपरी चिंचवड शहर शिवसेनेच्या वतीने महिला सक्षमीकरण व्हावे, या उद्देशाने “प्रथम ती’’ ही संकल्पना घेऊन महिलांच्या भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शिवसेनेच्या वतीने मंगळवार दि. 24 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता “प्रथम ती’’ हा भव्य महिला मेळावा घेण्यात येत आहे. या कार्यक्रमाची माहिती देताना आमदार चाबुकस्वार म्हणाले, महिला सक्षमीकरण गरजेचे आहे. अनेक महिलांनी विविध क्षेत्रात नावलौकीक मिळविला असून सामान्य जिवनात वावरणार्‍या महिलांना त्यांच्या मार्गदर्शनाची गरज आहे. त्यामुळे महिलांचे पंचशक्ती संकल्प यामध्ये शिक्षण, सुरक्षा, समता, स्वास्थ्य आणि स्वावलंबन या विषयांवर प्रमुख वक्त्या आमदार डॉ. मनीषा कायंदे, वीणा भागवत, नगरसेविका प्रवीणा मोरस्कर या मार्गदर्शन करणार आहेत. आकुर्डीतील खंडोबा मंदिर सांस्कृतिक भवन येथे आयोजित केलेल्या या कार्यक्रमास आमदार अ‍ॅड. गौतम चाबुकस्वार, पिंपरी चिंचवड शिवसेना शहर प्रमुख योगेश बाबर, शहर संघटीका अ‍ॅड. उर्मिला काळभोर व पक्षाचे सर्व पदाधिकारी, नगरसेवक, नगरसेविका उपस्थित राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.